सोयाबीन पीक धोक्यात...शेतकऱ्यांनो, या उपाययोजना करा...

महेंद्र शिंदे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

खेड तालुक्यातल सोयाबीन पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत आले आहे. भरात आलेल्या पिकावर खोडमाशी, पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. त्यामुळे कीड व तणापासून पीक वाचवण्यासाठी

कडूस (पुणे) : खेड तालुक्यातल सोयाबीन पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत आले आहे. भरात आलेल्या पिकावर खोडमाशी, पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. त्यामुळे कीड व तणापासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी सोयाबीन पिकावर औषध फवारणी करत आहे.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

खेड तालुक्यात खरीप हंगामात भुईमूग पिकाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याच्या बरोबरीने सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. तालुक्यात यंदा सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पीक सध्या फुलोऱ्यात आले आहे. दमदार उगवणीनंतर पावसाने ताण दिला होता, परंतु आठवड्यात काही भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाऊस झालेल्या भागात पिकाला जीवदान मिळाले आहे. पिकाची वाढ चांगली आहे. पीक फुलोऱ्यात आले आहे. पिकात तण सुद्धा वाढले आहे. तसेच, पिकावर खोडमाशी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. किडीचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर औषध फवारणीचे काम हाती घेतले आहे. तण व किडीपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करताना शिवारात दिसत आहे. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

असे करा कीड नियंत्रण
सोयाबीन पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी कृषी सहायक मोहिनी सावंत अकोलकर यांनी शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाकडे लक्ष देण्याची आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, शेतात कीड भक्षक पक्ष्यांसाठी पक्षी थांबे उभारा. कामगंध सापळ्याचा वापर करा. खोडमाशी व पाने खाणारी अळींच्या (स्पोडोप्टेरा) नियंत्रणासाठी 5 टक्के निबोंळी अर्क अथवा एस.एल.एन.पी.व्ही.(मॅजिक) विषाणू एल. ई. 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे अथवा क्विनॉलफॉस 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी 500 लिटर या प्रमाणात द्रावण फवारावे, किंवा 1.5 टक्के क्विनॉलफॉस भुकटी किंवा 2 टक्के मिथिल पॅरॉथिऑन हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळणी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infestation of larvae on soybean crop in Khed taluka