स्वच्छता, जलसंधारणातून मधापुरी विकासाकडे

madhapuri village development
madhapuri village development

सामूहिक प्रयत्नातून गावचा कसा कायापालट करता येऊ शकतो, याचे आदर्श उदाहरण अकोला जिल्ह्यातील मधापुरी गावाने निर्माण केले आहे. ग्रामस्वच्छता, जलसंधारण, शालेय विकास आदी विविध उपक्रम गावाने यशस्वी राबविले आहेत. जलद गतीने गावाने विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण केले आहे. 

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका मुख्यालयापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मधापुरी गावात सर्वांगीण विकासाच्या दिशेने चालले आहे. लोकसहभाग व योग्य दिशेने नियोजन, हा त्यातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. गावातील विविध विकासकामांवर एक दृष्टिक्षेप टाकूया.  

बोलकी शाळा
जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. गावकऱ्यांचा सहभाग, शिक्षकांचे नियोजन यातून जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा घडली आहे. प्रत्येक वर्ग डिजिटल झाला असून विद्यार्थ्यांना हसतखेळत पद्धतीने शिक्षण दिले जाते. शिक्षकांनी वर्गणी संकलित करीत टप्प्याटप्प्याने शाळेचा विकास साधला. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान प्रत्यक्ष मिळावे, यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा तयार करण्यात आली. शाळेच्या परिसरात वृक्ष वाढविले असून विविध प्रकारचे फलक त्यावर लावले आहेत. शाळेच्या भिंतीवर महामानवांचे उपदेश लिहिले आहेत. खेळण्यासाठी सुंदर पटांगण आहे. शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने केजी १ व २ हे इंग्रजी माध्यमाचे वर्ग विनामूल्य चालविण्यात येतात. ग्रामपंचायतीने वर्गखोल्या सुशोभित केल्या असून विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध केले आहे. या प्रयत्नांतून मुलांमध्ये इंग्रजीची गोडी वाढू लागली आहे.  

गल्लोगल्ली स्वच्छता
गावात सर्वत्र फिरत असताना स्वच्छता प्रामुख्याने दिसून येते. अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. नाल्याद्वारे सांडपाणी गावाबाहेर काढले जाते. कचरा टाकण्यासाठी कुंड्यांचा वापर केला जातो. महिन्यातून एकदा निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाते. प्रत्येक चौक स्वच्छ दिसून येतो. काँक्रीट नाल्यांवर डिव्हायडर, वेस्टेज पाइप बसविले आहेत. नागरिकांना बसण्यासाठी बाकडी आहेत. गावातील भिंतीवर स्वच्छता, शिक्षण व शासकीय योजनांच्या प्रसाराची माहिती तसेच एलईडी दिवे लावले आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे स्रोत शोधून पाणीपुरवठा केला जातो.

हिरवेगार शिवार 
जलसंधारणाची कामे गेल्या काही वर्षांत झाली आहेत. त्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न गावातील शेतकरी करतात. पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करणारेही शेतकरी आहेत. लोकसहभागातून सामूहिक शेततळे खोदले जात आहेत. शेतरस्त्यांची कामे सुरू आहेत. जवळपास एक लाख ४० हजार रुपये लोकवर्गणी जमा होताना ग्रामपंचायतीने ४० हजार रुपये वाटा दिला आहे. भारतीय जैन संघटनेने तीन जेसीबी यंत्रे उपलब्ध केली आहेत. चार शेततळी तयार केली असून आठ किलोमीटर अंतराचे पांदणरस्ते निर्माण होत आहेत.

गावात विविध विकासकामांच्या माध्यमातून कायापालट झाला आहे. गेल्या काही वर्षांत पाणी जमिनीत जिरवल्याने सिंचनाची सोय उपलब्ध झाली. पिकांचे उत्पादन वाढत आहे. शेतीमालाला केवळ योग्य बाजारमूल्य मिळण्याची गरज आहे.  
— सुधाकर बानाईत, प्रगतशील शेतकरी, मधापुरी 

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून गावात महिलांचे २४, तर तीन पुरुष गट स्थापन झाले आहेत. यापैकी तीन-चार गटांना प्रारंभिक टप्प्यातील निधी मिळाला आहे. येत्या काळात सर्व गट स्वयंरोजगाराचा व्यवसाय सुरू करणार आहेत. गटासाठी सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करणार आहोत.
— दीपाली सोळंके, गाव समुदाय संसाधन व्यक्ती, मधापुरी 

गावाला पंचायत समितीमार्फत शासकीय योजनेतून बायोगॅस युनिट्स दिले जाणार आहेत. लाभार्थी व्यक्तींची निवड सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक या इंधनाचा वापर घरी तसेच शेतीतही उपयोगात येईल. 
— मनोज बोपटे, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मूर्तिजापूर 

तीन हजार लोकसंख्येच्या आमच्या गावात ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते. गावशिवारात विविध योजनांच्या माध्यमातून लाभ पोचविण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे.
— प्रदीप ठाकरे, सरपंच  ९४२१७५२००९ 

फळबाग लागवड : ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत असलेल्या सर्वच खुल्या जागांचा योग्य वापर केला आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले. स्मशानभूमीला लागून असलेल्या ‘ई-क्लास’ जमिनीवर रोजगार हमी योजनेतून सीताफळाची लागवड झाली आहे. ही रोपे १०० टक्के जगविण्यात येत आहेत. खुल्या जागांना तारेचे कुंपण घातले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com