
जिल्ह्यातील गावागावांत सुरू असलेल्या ‘राइस मिलर्स’ना शोधूनही ग्राहक मिळेनासे झाले आहेत. तसेच गुंतवणूक करून धान, तांदळाची खरेदी करून परजिल्ह्यात विक्रीचा व्यवसाय करणारही आर्थिक संकटात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ‘राइस मिल’व्यवसाय अडचणीत
भंडारा- गेल्या दोन वर्षांपासून हमीभाव खरेदी केंद्रात धानाला चांगला भाव मिळत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा भरडाई न करता धानविक्रीकडे कल आहे. यामुळे जिल्ह्यातील गावागावांत सुरू असलेल्या ‘राइस मिलर्स’ना शोधूनही ग्राहक मिळेनासे झाले आहेत. तसेच गुंतवणूक करून धान, तांदळाची खरेदी करून परजिल्ह्यात विक्रीचा व्यवसाय करणारही आर्थिक संकटात आले आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
झाडीपट्टीतील पर्जन्यमानानुसार पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत धानाचे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे या भागात ‘राइस मिल्स’ उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. भंडारा जिल्ह्यात लहानमोठे ३५० ‘राइस मिल’ आहेत. खरिपाचे पीक आल्यापासून ‘राइस मिलर्स’चा चार महिने हंगाम सुरू होतो. ठोकळ, बारीक, सुगंधी अशा विविध प्रजातीच्या तांदळासाठी या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यातून व परराज्यातून मागणी होते. वेळप्रसंगी रेल्वेनेसुद्धा तांदळाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यापासून उन्हाळ्यापर्यंत धान व तांदळाच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. या खरेदी-विक्रीचा स्वयंरोजगार करणारे तरुण, व्यापारी, अडत्या सर्वांसाठी हंगाम महत्त्वाचा ठरत होता. सर्वाधिक तांदूळ विक्री होत असल्याने तुमसर शहराला तांदळाचे कोठार म्हणतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ
चांगल्या भावामुळे परिस्थिती बदलली
मागील वर्षापासून हमीभावासह राज्य सरकारकडून ७०० रुपये बोनस दिला जात आहे. त्यामुळे धानाची प्रतिक्विंटल किंमत २५०० रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे खुल्या बाजारात व बाजार समितीमध्ये तांदळाला मिळणारा भाव हमीभाव खरेदी केंद्रात धानाला मिळत आहे. त्यामुळे लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांचा कल खरेदी केंद्रात धानाची विक्री करण्याचा आहे. यामुळे कोणताही शेतकरी धान भरडाईसाठी ‘राइस मिल’मध्ये जात नाही. यामुळे कोट्यवधींचे कर्ज घेऊन आधुनिक यंत्र बसविणाऱ्यांना व्याजही मिळेनासे झाले आहे. मिलींग झाल्याबरोबर तांदळाची जात व दर्जापाहून मागणी करणारे व्यवसाय ठप्प झाले आहेत. गुंतवणूक करून परजिल्ह्यात तांदूळ विक्री करणाऱ्यांना गुंतवलेली मुद्दल काढणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी मार्केटींग फेडरेशनकडून सर्वाधिक ३२ लाख क्विंटल धानखरेदी करण्यात आली होती. यावर्षीही २५ लाख क्विंटल धानखरेदी करण्यात येईल, असा अंदाज आहे.
Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...
नव्या तांदळाची चव दुर्मिळ
खरिपातील नवीन धान व तांदूळ बाजारात येताच त्यापासून पोहे, मुरमुरे, चिवडी तयारी करून गावोगावी विकणारे लहान व्यावसायिक हल्ली दिसेनासे झाले आहेत. तसेच नवीन तांदळापासून घरोघरी बनविले जाणारे साधे पदार्थ भरून तयार केलेले गुंजे आणि नवीन तांदळाचा शिजवताना येणारा सुगंध सर्वकाही मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळतो, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यामुळे जिल्हावासीयांच्या तोंडची चव पळालेली आहे.
Web Title: Rice Mill Business Bhandara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..