
Ahmednagar News : वडगाव, पिंपळगावातील आरक्षण उठले; डॉ. सुजय विखे
अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदे तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. त्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीसाठी आरक्षित केलेल्या पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता येथील ४६१ हेक्टर जमिनीवरील आरक्षण उठवले आहे.
या भागातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील एमआयडीसी नाव निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की नगरच्या एमआयडीसीसाठी जमीन आरक्षित करताना वडगाव गुप्ता आणि पिंपळगाव माळवी येथील गावकऱ्यांना, तसेच शेतकऱ्यांना विचारात घेतले नव्हते. बागायती जमीन आरक्षित करण्यात आली होती.
हा तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होता. उद्योग-धंदे आले पाहिजेत, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे योग्य नाही. त्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांच्यासह आमचा हे आरक्षण उठविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे.
वडगावची २४३ व पिंपळगावची २१७, अशा एकूण ४६१ हेक्टरवर एमआयडीसीचे नाव लागले होते. या गावांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उद्योगमंत्र्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. कोणत्याही ठिकाणी एमआयडीसी करताना पाणी लागणार आहे. मुळा धरणात तेवढे पाणी आहे का, हेही पाहिले पाहिजे.
कुणाला घाबरत नाही
निवडून आल्यापासून कामाचा धडाका लावला, परंतु ती कामे लोकांपर्यंत पोचवून प्रसिद्धी केली नाही. याचाच फायदा उठवत काही लोकांनी ती आपणच केल्याचा गवगवा केला. हे टाळण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषदा घेण्याचा सल्ला कर्डिले यांनी दिला.
त्यामुळेच कामे लोकांपर्यंत नेणार आहे. तसा मी कोणाला घाबरत नाही. उलट, काही प्रमाणात लोकच आम्हाला घाबरतात. पण तसे घाबरण्याचेही कारण नाही, अशी मिस्किलीही खासदार विखे यांनी केली.
उद्योजक सुप्याला जाईनात
नगरच्या उद्योजकांची बैठक घेतली. त्यावेळी वेगळेच प्रश्न समोर आले. सुपे एमआयडीसीत जागा शिल्लक आहे, परंतु तेथे जाण्यास उद्योजक तयार नाहीत. जपानमधील कंपन्यांनीही काढता पाय घेतला आहे, असे विखे म्हणाले. तेथे दहशत आहे, अशी चर्चा असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. ती कोणाची आहे, याचा तुम्हीच शोध घेतला पाहिजे, अशी गुगली त्यांनी टाकली. उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घेऊन दोन्ही एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू.
कर्डिलेंकडून डावपेच शिकलो
आता मीही डावपेच शिकलो आहे. राजकीय आखाड्यात माजी मंत्री कर्डिले यांनी मला डावपेच शिकवले. ते राजकीय आणि कुस्तीच्या आखाड्यातील मुरब्बी मल्ल आहेत. ते गुरू असल्यावर मला कसलीच चिंता नाही, असेही विखे पाटील म्हणाले.