महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांवर हल्ला

विलास कुलकर्णी
Monday, 20 July 2020

सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड व प्रतिकार केल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले.

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरामध्ये अत्यंत रहदारीच्या ठिकाणी रविवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल देसले यांच्यावर अचानक गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. 

सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड व प्रतिकार केल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या दोघांनी अचानक मागून येवून डॉ. देसले यांना बाजूला घेवून हल्ला चढविला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हेही वाचा - दगडाला अभिषेक घालून मोदी सरकारचा निषेध

अत्यंत मनमिळावू व कोणाशीही शत्रुत्व नसलेल्या या प्राध्यापकावर झालेल्या हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या अस्मितेवर पर्यायाने विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक यांच्या सन्मानावर हल्ला झाल्याचे आज विद्यापीठ वर्तुळात चित्र दिसून आले.

अशा गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने निवेदन दिले आहे. मध्यवर्ती परिसरातील प्राध्यापक उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांना भेटून या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आपला निषेध व्यक्त केला.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, धुळे तसेच कोल्हापूर येथील सर्व कर्मचारी, प्राध्यापक व शास्त्रज्ञांनीही आपापल्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये या गोष्टीचा निषेध नोंदविला. या प्रकरणाचा तातडीने छडा न लागल्यास दहाही जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

राहुरीचे पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख, विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी सुनिल फुलसवंगे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे डॉ. देसले यांच्या संपर्कामध्ये असून मारेकऱ्यांच्या तपासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on professors at Mahatma Phule Agricultural University