
कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच ठाण्यातील कर्मचाऱ्यातील बेनवाब थांबवण्याचे आव्हान नूतन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना पेलावे लागणार आहे.
कर्जत (अहमदनगर) : वाळू तस्करी, चोऱ्यांचे सत्र व अवैध धंदयांना पायबंद घालण्याबरोबरच होऊ घातलेल्या 56 ग्रामपंचायत आणि येथील नगरपंचायत निवडणूक, तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच ठाण्यातील कर्मचाऱ्यातील बेनवाब थांबवण्याचे आव्हान नूतन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना पेलावे लागणार आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येथील पोलिस ठाण्यातील निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या बदलीनंतर या पदावर चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्विकारला असून कामकाजास सुरुवात केली आहे. सध्या विविध पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच अवैध धंदयांनी चांगलेच डोके वर काढले आहे.
ग्रामीण भागात सर्वत्र सुरु असलेली अवैध दारु विक्री, शहरासह अनेक मोठया गावांमध्ये चोरी चोरी चुपके चुपके सुरु असलेले जुगार अड्डे, लिलाव झालेला नसतांनाही सुरु असलेला वाळू उपसा, वाहन व मोबाईल चोऱ्यांचे सत्र, अल्पवयीन पळवा पळवी, शिस्तीत बेशिस्तीचे वाहन चालकाचे दर्शन, रस्त्याच्या मधोमध मोबाईलवर बोलणे, होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली असल्याने नव्याने आलेल्या यादव यांच्या समोर ते थांबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
हेही वाचा : औट घटकेचे खरेदी केंद्र! कोपरगाव बाजार समितीतील मका हमीभाव केंद्र सहा दिवसांतच बंद
तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा असून पूर्वेला मराठवाडयाच्या सरहद्दीमुळे अनेक गुन्हेगारांचा याभागात वावर असतो. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा विचार करता मोठे कार्यक्षेत्र सांभाळण्याचे कसब असलेला अधिकारी कर्जतला आवश्यक होता. श्री यादव यांनी यापूर्वी वर्धा, कोल्हापूर, दौंड, बिगवन यासह अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ते ओळखले जातात.तसेच महिला व मुलींच्या संरक्षणाचा यादव पॅटर्न त्यांच्या नियुक्तीच्या सर्व ठिकाणी चर्चेत आहे.
कर्जत तालुक्यात फारसा राजकीय संघर्ष नसला तरी त्यांना दुस-या फळीतील राजकीय कार्यकर्त्यांना व वाळू तस्करीतील मोरक्यांना ठराविक अंतरावर ठेवून कामकाज करावे लागणार आहे. येत्या काही दिवसात तालुक्यातील 56 ग्रामपंचायती व कर्जत नगरपंचायत निवडणुक होत आहे. त्या निमीत्त विद्यमान आमदार रोहित पवार व भाजप चे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर मोठा संघर्षही पहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत यादव यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.
पोलिस प्रशासन आणि नागरिक यांच्यात आपलेपणाची भावना व विश्वासार्हता राहिली पाहिजे. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यास आपले प्रथम प्राधान्य राहील. पोलीस आणि सर्व सामान्य नागरीक यांच्यातील समन्वय राखण्यासाठी आपण सर्वांना बरोबर घेवून प्रयत्न करु.पार्किंग संदर्भात व्यापाऱ्यांशी बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल. मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या कोणाचीही गय केली जाणार नाही.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत
संपादन : अशोक मुरुमकर