esakal | तंटामुक्त गावाच्या शांततेला लागली दृष्ट! तब्बल 20 जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

village

शांतताप्रिय तंटामुक्त गावातच राडा! 20 जणांवर गुन्हा

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : शांतताप्रिय असणाऱ्या गावांमध्ये 'या' गावाची ओळख आहे. गावातील वाद जागीच मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी गावाचा एकोपा चर्चेत आहे. बुधवारी तेथे झालेला राडा गावाची शांतता भंग करणारा ठरला.

गावाच्या शांततेला लागली दृष्ट

उक्कडगावच्या लोकांचा संपर्क श्रीगोंद्यापेक्षा शिरूर (जि. पुणे) येथे जास्त आहे. शिरूरच्या जवळ असणारे हे गाव कमालीचे शांत असते. गावातील राजकारणात सगळ्याच पक्षांचे तगडे कार्यकर्ते आहेत. काहींनी तालुकापातळीवर चांगले काम करीत ठसा उमटविला आहे. बेलवंडी पोलिसांत या गावातील तक्रारींचे प्रमाण त्यामानाने कमी असल्याचे गावकरी भूषणाने सांगतात. मात्र, कालच्या प्रकाराने या शांततेला दृष्ट लागली, हे मात्र निश्चित. तंटामुक्तीच्या अध्यक्षांच्या निवडीच्या ग्रामसभेतील गोंधळात परस्परांविरुद्ध फिर्यादी आल्याने वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही घटनांचा निकाल न्यायालयात होईल, पण गावाची शांतता मात्र भंग होण्यास तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड कारणीभूत ठरली आहे.

हेही वाचा: ‘लोकायुक्त’साठी अण्णा हजारे आक्रमक; राज्य सरकारला दिला अल्टिमेटम

तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड कारणीभूत

तेथील महिला सरपंचांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकार निंदनीय आहे. त्याच वेळी समोर ग्रामसभेत असणाऱ्या महिलेलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकारही घृणास्पद आहे. या दोन्ही प्रकारांत एकूण वीस जण आरोपी झाले आहेत. गावातील शांतता भंग होऊ नये, गावात सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांची नेमणूक करण्यात येते. ही निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. गाव ठरवील तो अध्यक्ष होतो व त्यासाठी होणाऱ्या सभेत तंटा होऊ नये, ही प्रशासनाची अपेक्षा आहे. येथे मात्र उलटेच घडले. गावाने एकत्रित अध्यक्ष निवडणे आवश्यक असताना, निवडीतच राडा झाला.

हेही वाचा: पारनेर : आमदार लंकेंच्या समर्थकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

समजलेल्या माहितीनुसार, दोन गटांचे राजकीय हेवेदावे उफाळून आले आणि गोंधळ झाला. दोन्ही गटांना त्यांचाच अध्यक्ष हवा होता. त्यावरून वादंग झाले आणि दोन महिलांच्या बाबतीत चुकीचा प्रसंग घडला. आता तरी गावकारभाऱ्यांनी शहाणे होऊन, पुन्हा एकत्र बसून वाद मिटवावा व गावातील पूर्वीची शांतता पुन्हा आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे घ्यावे, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

राजकारण निकोप असावे. गावाच्या विकासात राजकारणाचा उपयोग व्हावा. उक्कडगावात चुकीचे घडले आहे. तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या सभेतच महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार होत असेल, तर आम्हाला भविष्यात गावाकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. एकत्रित येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. - संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी

हेही वाचा: लोणी: तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

loading image
go to top