esakal | धक्कादायक! शेवगावमध्ये पावसामुळे एटीएममध्ये राहतायेत...
sakal

बोलून बातमी शोधा

Dogs live in ATMs in Shevgaon taluka due to rains

भारतीय स्टेट बँकेच्या ए. टी. एममधील अस्वच्छता व कचऱ्यामुळे त्यास अक्षरश: कचरा कुंडीचे स्वरुप आले आहे. ग्राहकांना नाक मुठीत धरुन व्यवहार करावे लागत आहेत.

धक्कादायक! शेवगावमध्ये पावसामुळे एटीएममध्ये राहतायेत...

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या ए. टी. एममधील अस्वच्छता व कचऱ्यामुळे त्यास अक्षरश: कचरा कुंडीचे स्वरुप आले आहे. ग्राहकांना नाक मुठीत धरुन व्यवहार करावे लागत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी अधिच संसर्गाची भिती वाढलेली असतांना त्यात बँकेच्या गलथान कारभाराची भर पडून ग्राहकांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.

शहरामध्ये स्टेट बँकेचे तीन एटीएम असून त्यातील एक एटीएम नेवासे रोडवरील बँकेच्या शाखेच्या आवारात आहे. तर एक आंबेडकर चौकात व दुसरे मिरी रोड येथील रेसिडेन्शिअल विदयालयाजवळ आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक असून अनेक ग्राहक कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांचा संपर्क टाळण्यासाठी व कमी वेळेतील व्यवहारासाठी एटीएमचा वापर करतात.

नेवासे रोडवरील शाखेनजिकच्या एटीएम केंद्रात बँकेतील कर्मचाऱ्यांकडून नियमीत स्वस्छता राखली जाते. मात्र आंबेडकर चौक व मिरी रस्त्यावरील ए.टी.एम केंद्रांची अनेक दिवस स्वच्छता केली जात नाही. त्यातच अनेक जण मावा, तंबाखु खावून आतामध्ये थुंकतात तसेच व्यावहाराची कागदी पावती (चलण) तेथेच टाकतात. त्यामुळे आतमध्ये मोठया प्रमाणावर कचरा साचतो. तो अनेक दिवस उचलला जात नसल्याने त्याची दुर्गंधी सुटते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बँकेतील कर्मचारीच या केंद्राची स्वच्छता करत असल्याने त्यांना बँकेतील कामातून फारशी फुरसत न मिळाल्याने ए.टी.एम केंद्रांना कचरा कुंडीचे स्वरुप येते. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे तर अस्वच्छतेचा कहर झाला असून मोकाट जनावरे पावसात कायम उघडया असलेल्या ए.टी.एम केंद्राचा आश्रय घेतात. त्यामुळे जनावरांच्या मलमुत्राने ए.टी.एम वापरणे ग्राहकांना जिकीरेचे ठरते. दुर्गंधीमुळे आतमध्ये पाऊल टाकता येत नसतांना ही अडल्यानडलेल्या व्यवहारापोटी नाक मुठीत धरुन ए.टी.एमचा वापर करावा लागतो. शहरातील सर्वच ए.टी.एम केंद्राची स्वच्छतेची कमी अधिक प्रमाणात हीच अवस्था असून संबंधीत बँका मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

सध्या आँनलाईन व्यवहाराला ग्राहक प्राधान्य देत आहेत. प्रत्यक्ष बँकेत जावून व्यवहार करण्याऐवजी ग्राहक ए.टी.एमचा वापर मोठया प्रमाणावर करतात. मात्र शहरात उपलब्ध असलेल्या विविध बँकेच्या 9 ते 10 .टी.एम केंद्रापैकी फक्त मोजक्या तीन चार केंद्रावरच रोख रक्कम उपलब्ध असते. उर्वरीत बँकांचे ए.टी.एम केंद्र फक्त शोभेपुरते असून ग्राहकांना त्याचा काहीही फायदा होत नाही. स्टेट बँकेच्या खालोखाल ग्राहक संख्या असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या एकमेव ए.टी.एम केंद्रामध्ये कधीही रक्कम उपलब्ध नसल्याने त्या बँकेच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

स्टेट बँकेचे ग्राहक सुधीर कंठाळी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ए.टी.एम केंद्रातून मोठया प्रमाणावर संसर्गाचा फैलाव होवू शकतो. अशा परिस्थितीत ए.टी.एम वापराबाबत व स्वच्छतेबाबत शासनाने घालून दिलेले निर्देश शेवगाव येथील कोणत्याही बँकेच्या ए.टी.एम केंद्रात पाळले जात नाहीत. त्यामुळे याकडे संबंधीत बँकेच्या शाखेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top