esakal | वेठबिगारीतून सुटका अन् घेतली भरारी! माळरानावर फुलवलं नंदनवन
sakal

बोलून बातमी शोधा

family freed from forced labor by a social organization  found success in farming

वेठबिगारीतून सुटका अन् घेतली भरारी! माळरानावर फुलवलं नंदनवन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (जि. नगर) : ऐन तारुण्यात संदीप काळे यांचे कुटुंब नऊ वर्षे मावळ तालुक्यातील एका जमीनदाराकडे वेठबिगार म्हणून डांबून ठेवले होते. हलाखीचे जीवन जगत असलेल्या या कुटुंबाची सामाजिक संस्थेने सरकारी मदतीच्या आधारे सुटका केली. त्यांना आर्थिक व मानसिक आधार देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. यात संजू व त्यांच्या कुटुंबाची जिद्द आणि अपार कष्टाच्या तयारीमुळे या कुटुंबाने दोन वर्षांत सरकारकडून मिळालेल्या पाच एकर खडकाळ माळरानावर नंदनवन उभे केले. आज तेथे भाजीपाल्यासह इतर सोन्यासारखी पिके दिमाखात डोलत आहेत.


आकाशात उंच भरारी मारणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे संदीप व त्याच्या कुटुंबाने आकाशात उंच भरारी घेतली आहे. दुसऱ्याच्या शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करून पोटभर जेवणसुद्धा हक्काने मिळत नसलेल्या संजूची कहाणी हृदयाला भिडणारी आहे. मावळ तालुक्यातील एका गावात धनाढ्य शेतकऱ्याने संदीप काळे (रा. पळशी, ता. पारनेर) याच्यासह २२ लोकांना वेठबिगार म्हणून सुमारे नऊ वर्षे बंदिस्त अवस्थेत ठेवले होते. त्यांना आवाराबाहेर पडण्याचीसुद्धा मुभा नव्हती. या २२ जणांना कैद्यांप्रमाणे तारेच्या कुंपणाच्या आत डांबून ठेवले होते. त्यांना पळूनसुद्धा जाणे शक्य नव्हते. याच ठिकाणी संजूची पत्नी आजारी असताना केवळ औषधोपचाराअभावी मरण पावली होती.

हेही वाचा: पारनेर : आमदार लंकेंच्या समर्थकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा


ही माहिती मुंबईच्या बालमजूर आयजेएम या स्वयंसेवी संस्थेला मदन पथवे यांच्यामार्फत समजली. त्यांनी मुंबई कामगार आयुक्त, मावळ पोलिस, तहसीलदारांशी संपर्क करून काळे कुटुंबासह 22 लोकांची 28 जून 2019 रोजी सुटका केली होती. संदीपच्या कुटुंबास गावी आणले. वडिलांना सरकारकडून मिळालेली खडकाळ पाच एकर जमीन तयार करून नव्याने जगण्याच्या लढाईचा निर्धार संदीप, त्याचे बंधू सुरेश व कुटुंबाने केला. आज त्याचे कुटुंब स्वतःच्या पायावर, कोणाच्याही आधाराविना अभिमानाने जगत आहे.

संदीप व सुरेश यांना शेतीचे तंत्र आत्मसात होते, परंतु त्याला पिकाऊ जमीन व भांडवल नव्हते. त्यास राज्य सरकारच्या पुढाकाराने, डॉन बॉस्को संस्थेच्या वतीने ब्रदर अॅलेक्स गोन्साल्विस यांनी खडकाळ व कोरडवाहू शेताचे सुपीक क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी मदत केली. नगर येथील सीएसआरडी संस्थेमार्फत संशोधन करून खडकाळ जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर केले. कूपनलिका घेऊन ही खडकाळ जमीन बागायती केली आहे. पिकाबरोबरच नफा मिळविण्याचे तंत्रही संदीपने सीएसआरडीचे प्राचार्य व डॉन बॉस्कोचे स्वयंसेवक यांच्याकडून घेतले. आज हे कुटुंब इतरांसाठी प्रेरणादायी म्हणून समाजात ताठ मानेने उभे आहे.


जीवनात कधीच खचून जाऊ नये. इच्छा तिथे मार्ग असतो. आम्हा सर्वांना सरकारकडून सुमारे 11 लाखांची मदत मिळाली. मेलेल्या अवस्थेत आम्ही जगत होतो. केवळ विविध सामाजिक संस्था व सरकारी मदतीने आज आम्ही पुन्हा जिवंत झालो.
- संदीप काळे

हेही वाचा: अवघ्या २० रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या; नाशिकमधील प्रकार


इंटरनॅशनल जस्टिस मिशन (IJM)-

देशपातळीवर काम करणारी इंटरनॅशनल जस्टिस मिशन (IJM) ही सामाजिक संस्था असून, गरीब लोकांना हिंसा आणि शोषणापासून संरक्षण करण्यास मदत करते. सरकारबरोबर मानवी तस्करी, वेठबिगार मजूर, अल्पवयीन मुलांचे व्यावसायिक व लैंगिक शोषणापासून संरक्षण देण्याचे काम करते. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, बिहार अशा 10 राज्यात काम सुरू आहे. आतापर्यंत सरकारच्या मदतीने 22 हजारांवर मजुरांची सुटका केली आहे.

हेही वाचा: सरकार मायबाप शाळेचा श्रीगणेशा केव्हा?

loading image
go to top