माणसानंतर जनावरांमागे शुक्‍लकाष्ठ; दक्षिण आफ्रिकेतील आजाराचा नगर जिल्ह्यात शिरकाव

दौलत झावरे
Thursday, 27 August 2020

कोरोनामुळे मानवजात धास्तावलेली असताना, आता जनावरांमागेही आजाराचे शुक्‍लकाष्ठ लागले आहे.

नगर : कोरोनामुळे मानवजात धास्तावलेली असताना, आता जनावरांमागेही आजाराचे शुक्‍लकाष्ठ लागले आहे. जनावरांना "लम्पी स्किन डिसीज' या आजाराची लागण होत असून, गोधेगाव (ता. नेवासे) येथील सात जनावरे बाधित आढळून आली आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील जनावरांत हा आजार दिसतो.

भारतात ऑगस्ट-2019 मध्ये ओडीसात पहिल्यांदाच या आजाराने शिरकाव केला. त्यानंतर पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आदी राज्यांमध्ये त्याचा फैलाव झाला. एप्रिलमध्ये तो महाराष्ट्रात आला. सुरवातीला गडचिरोली व नंतर बीड मार्गे गोधेगाव (ता. नेवासे) येथे या आजाराने बाधित सात जनावरे आढळून आली. तेथील सहा पशूपालकांच्या 22 पैकी 7 जनावरांना हा आजार झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी तातडीने जनावरांवर उपचार सुरू केले. जिल्ह्यात आणखी किती जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, याची पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गाय-म्हशींना धोका

"लम्पी स्किन डिसीज'ची बाधा होण्याचे प्रमाण 10 ते 20 टक्के असून, त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण एक ते पाच टक्के आहे. संकरित व देशी गाय, म्हैशीला या आजाराची बाधा होऊ शकते. वासरांमध्ये त्याची तीव्रता अधिक असते. हा आजार शेळ्या-मेंढ्या वा मानवास होत नाही. बाधित जनावरास डास, चावणाऱ्या माशा व गोचिड यांच्यामार्फत या आजाराचा प्रसार होतो. उष्ण व दमट हवामानात प्रसार जास्त प्रमाणात होतो.

आजाराची लक्षणे
जनावरांना ताप येतो. डोळ्यातून, नाकातून स्राव गळणे, भूक मंदावणे, डोके, मान, पोट, पाठ, पाय, तसेच शेपटीखाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटरच्या गाठी येणे. नाक-तोंडाच्या आतील भागात गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळाला सूज येणे, अशी लक्षणे आढळतात.

आजारावर उपचार
हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर सध्या उपचार नाहीत. परंतु जखमांमधून विषाणूंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नयेत, म्हणून प्रतिजैविके व इतर औषधे तीन ते पाच दिवस द्यावी लागतात. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचा वापर करावा लागतो. ताप कमी करण्यासाठी औषधोपचार करणे आवश्‍यक आहे. सध्या लस उपलब्ध नसली, तरी "गोट पॉक्‍स' लस दिल्यास रोगाचा प्रसार थांबतो व जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. बाधित पशूधन इतर जनावरांपासून अलगीकरण करणे आवश्‍यक आहे. साथ आलेल्या भागातील पशूधनाची वाहतूक व विक्री थांबवावी. रोगाचा प्रसार करणारे डास, माशा व गोचिड यांच्या निर्मुलनासाठी उपाययोजना करावी.

हेही वाचा : शिवराज पाटील यांची नवी मुंबईत सिडकोवर नियुक्ती
मृत जनावरांची विल्हेवाट

आजाराच्या निदानासाठी भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्‍युरिटी ऍनिमल डिसिजेस येथे बाधित जनावरांच्या रक्ताचे नमुने, उती, रक्तजल, नाकातील स्राव, यांसारखे नमुने पाठवावे लागतात. मृत जनावरे आठ फूट खोल खड्डा खोदून त्यात पुरावेत. त्यावर चुना किंवा इतर जंतूनाशके टाकून त्याची विल्हेवाट लावावी.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infestation of animal diseases South Africa in nagar district