जयंत पाटील म्हणाले, निळवंडे धरणाचे श्रेय थोरात पिता-पुत्रांनाच

शांताराम काळे
Thursday, 14 January 2021

कालव्यांसंदर्भात निळवंडे विश्रामगृहावर बैठक झाली. तालुक्‍याच्या प्रश्नांबाबत आमदार लहामटे, अशोक भांगरे यांनी मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. 

अकोले : ""निळवंडे जलाशयाच्या कामाचे श्रेय थोरात पिता-पुत्रांनाच जाते. धरणाच्या कालव्यांचे काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी निधीची उपलब्धता करून कामाचे योग्य नियोजन करण्यात येईल,'' असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे जलाशयाला भेटीप्रसंगी केले. 

बुधवारी (ता. 13) सायंकाळी सहा वाजता ते निळवंडे जलाशयावर आले. त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अलका आहेरराव, कार्यकारी अभियंता संगीता जगताप, जी. बी. नानोर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - अधिकाऱ्याने नाद केला पण अंगलट आला

कालव्यांसंदर्भात निळवंडे विश्रामगृहावर बैठक झाली. तालुक्‍याच्या प्रश्नांबाबत आमदार लहामटे, अशोक भांगरे यांनी मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. 

म्हाळादेवी येथील कालव्यावरील जलसेतू, तसेच निळवंडे धरणाच्या भिंतीवर जाऊन त्यांनी पाहणी केली. "निळवंडे'चे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. नंतर पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. 

तसेच प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील लोकांचे प्रश्न समजून घेतले. कामावरील उपलब्ध यंत्रसामग्री व कामगारांचा तपशील समजून घेतला. 

म्हाळादेवी येथील प्रकल्पग्रस्तांच्या सात-बारा उताऱ्यांवरील "महाराष्ट्र शासन' नाव काढण्याची मागणी शिवसेनेचे नेते प्रदीप हासे यांनी केली. मे 2023पूर्वी निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांची बैठक बोलाविण्याची सूचना पाटील यांनी केली.

कालव्यांची कामे करताना, खराब होणाऱ्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्याची मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil said the credit for Nilwande dam goes to father and son in Thorat