esakal | महाराष्ट्रात भरतोय अॉनलाईन आखाडा...कुस्ती मल्लविद्यामुळे घरबसल्या सराव
sakal

बोलून बातमी शोधा

Online practice of wrestlers in Maharashtra

पंधरा हजारावर मल्ल कुस्तीचा सराव करतात. बहुतांशी तालमींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच आहेत. परंतु कोरोनाने सर्वांच्याच सरावावर पाणी फेरले आहे.

महाराष्ट्रात भरतोय अॉनलाईन आखाडा...कुस्ती मल्लविद्यामुळे घरबसल्या सराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाने सर्वच खेळ बंद पाडले आहे. आणि खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झाला आहे. बुद्धिबळसारख्या खेळातील प्रशिक्षकांनी त्यावर अॉनलाईन प्रशिक्षणाचा उतारा शोधला आहे. मात्र, मैदानी खेळ खेळणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुस्तीसारख्या खेळावरही त्याचा परिणाम होत आहे. काही पैलवान तर तालमी सोडण्याच्या विचारापर्यंत आले आहेत.

कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नगर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी मोठमोठी कुस्ती संकुल आहेत. उत्तर महाराष्ट्रातही कुस्ती रूजली आहे. या सर्व ठिकाणी मिळून किमान पंधरा हजारावर मल्ल कुस्तीचा सराव करतात. बहुतांशी तालमींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच आहेत. परंतु कोरोनाने सर्वांच्याच सरावावर पाणी फेरले आहे.

पैलवानासाठी एक वर्ष नव्हे तर एकेक दिवस स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. परंतु लॉकडाउनमुळे अंगमेहनत करता येत नाही. सराव बंद असल्याने काही पैलवानांनी कुस्ती सोडण्याचा विचार सुरू केला होता. काहीजण मनाने खचून गेले होते.

कुस्तीपटूंना मोठा खुराक लागतो. त्यासाठी बहुतांशी मल्ल जत्रा-यात्रांतील आखाड्यावर अवलंबून असतात. परंतु लॉकडाउनमुळे यात्रा-जत्राच बंद आहेत.तेथे मिळणारी बिदागी ही पैलवान मंडळींसाठी आर्थिक उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. परंतु सर्वच बंद असल्याने सर्व पैलवान आपापल्या गावी निघून गेले. 

ही माहिती वस्ताद व कुस्तीचे प्रसारक गणेश मानगुडे यांच्या कानावर गेली. त्यामुळे त्यांनी नामी शक्कल लढवली. पैलवानांना घरबसल्या प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले पाहिजे, यासाठी फेसबुक लाईव्हचा आधार घेतला.

हेही वाचा - साहेब लवकर या तो प्रेमिकेचा सौदा करतोय

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या कुस्ती-मल्लविद्या फेसबुक पेजवर गेल्या दीड महिन्यापासून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. दररोज एक किंवा दोन कुस्ती, अभिनय, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील नावाजलेल्या पाहुण्यांना थेट प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्रभरातील पैलवानांशी लाईव्ह संवाद करण्यात येतो. मानसिकता कशी खंबीर बनवायची, आहार कसा घ्यायचा, नवनवीन डाव कसे टाकायचे, निराशा टाळण्यासाठी काय करायचे, कोणत्या आहारामुळे वजन वाढते किंवा घटते याची माहिती स्वतः प्रथितयश खेळाडू माहिती देतात. या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यातील किस्सेही समजत आहेत.

राष्ट्रकुल विजेते, जागतिक कुस्ती स्पर्धेतील विजेते,एशियन गेम्स मधील विजेते,ऑलिंपिक गेम्समधील विजेते, अर्जुनवीर,पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार प्राप्त यासह मातीतल्या कुस्तीतील हिंदकेसरी, रुस्तुम-ए-हिंद, भारत केसरी, पैलवान दररोज महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी कुस्ती-मल्लविद्या फेसबुक पेजद्वारे लाईव्ह संवाद साधतात व त्यांच्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या अनुभवांचे गाठोडे त्यांच्यासाठी खुले करतात.

यांनी साधला संवाद

पै.अॉलिम्पिक पदक विजेते राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर, युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, हास्यसम्राट भारत पाटील, भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, राहुल जाधव (संस्थापक मल्लविद्या कुस्ती केंद्र), कुस्ती मल्लविद्या प्रवक्ते पै.संग्राम कांबळे, शिवव्याख्याते पै.विवेक सदगीर, मुंबई महापौर केसरी पै.भारत मदने, कुस्ती मल्लविद्या अमेरिका संघटक पै.हरिदास भोगाडे, पै.विलास डोईफोडे-महिला प्रवक्ते सौ.अनुराधा दिवेकर, जेष्ठ कुस्ती निवेदक पै.शंकर अण्णा पुजारी, सांगाती संस्थेचे संस्थापक सुजित निलेगावकर, महान महाराष्ट्र केसरी पै.दिलीप नाना भरणे, स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट मनीष परदेशी, उप महाराष्ट्र केसरी पै.किरण भगत, उप महाराष्ट्र शैलेश शेळके, पै.धर्मराज पाटील-भारतीय सेना, कुस्ती मल्लविद्या प्रवक्ते पै.तानाजी चवरे, मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे चे वस्ताद माऊली मांगडे, महान महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख, रुस्तुम ए हिंद पी.कृष्ण कुमार -शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.गोविंद पवार, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती पै.कु.रेश्मा माने - जागतिक कांस्यपदक विजेता Dysp नरसिंग यादव, कुस्ती सम्राट पै.अस्लम काझी, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त बजरंग पुनीया - पैलवान ग्रुप अध्यक्ष पै.मारुती जाधव,-सिने अभिनेते पै.प्रवीण तरडे. आंतरराष्ट्रीय पै.नासिर कुरेशी - तुझ्यात जीव रंगला अभिनेता पै.हार्दिक जोशी, कुर्डुवाडीचे वस्ताद अण्णा ढाने - राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पै.रणजित नलवडे.2 मे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कौशल्या वाघ -कुस्ती मल्लविद्या संस्थापक अध्यक्ष पै. गणेश मानुगडे.3 मे - लघुपट निर्माते संदीप यादव - सेना केसरी गुंडाजी पाटील.4 मे- हिंदकेसरी मौसम खत्री.5 मे - राष्ट्रीय विजेता प्रीतपाल सिंह.-मल्लसाम्राट रावसाहेब मगर.6 मे - राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती नेहा काकरान.7 मे - आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर नैना कनवाल - महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के.8 मे - कुस्ती मल्लविद्या तामिळनाडू प्रमुख महादेव सुर्वे - अहमदनगर जिल्हा तालीम संघ अध्यक्ष पै.वैभव लांडगे.9 मे - कुस्ती निवेदक प्रशांत भागवत - हिंदकेसरी संतोष वेताळ.10 मे - आंतरराष्ट्रीय महिला पैलवान पिंकी,1976 महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम,पद्मश्री योगेश्वर दत्त. भारतातील सर्वात बलाढ्य पैलवान जस्सा पट्टी.

महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राला कोरोना मुळे आलेली मरगळ हटावी व कुस्ती क्षेत्रात खेळीमेळीचे वातावरण व्हावे यासाठी सदर LIVE परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रभरातून त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

loading image