राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडून केली अपेक्षा व्यक्त

गौरव साळुंके
Friday, 13 November 2020

पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी युती सरकारने मंजूर केलेल्या 50 हजार कोटींच्या आराखड्याला महाविकास आघाडी सरकारने कृतीत उतरविल्यास दुष्काळी भागाच्या संघर्षाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी युती सरकारने मंजूर केलेल्या 50 हजार कोटींच्या आराखड्याला महाविकास आघाडी सरकारने कृतीत उतरविल्यास दुष्काळी भागाच्या संघर्षाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून जाफराबाद येथे झालेल्या पाझर तलावाचे नामकरण "लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील पाझर तलाव' असे करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन व जलपूजनाच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे, नानासाहेब शिंदे, दीपक पठारे, नितीन भागडे, सोन्याबापू शिंदे, गिरिधर आसने, गोरक्षनाथ ताके, गणेश मुदगले, सरपंच संदीप शेलार आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, ""गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी सरकारला सादर केलेल्या आराखड्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. दुष्काळी पट्ट्याला न्याय देण्यासाठी गतीने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे पाण्यासाठी केलेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनेही दुष्काळी भागासाठी काही पावले टाकली पाहिजेत.'' 

हेही वाचा : दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा; खोट्या योजनेत लाखोंची फसवणूक
युती सरकारने गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्‍नासाठी 50 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी, तसेच ग्रामीण विकासासह शेतकऱ्यांनीही स्वयंपूर्ण होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुरकुटे यांनी, शाश्‍वत पाणी उपलब्ध झाल्यास मोठ्या संख्येने तयार केलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल, असे सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil expressed the expectation from the Mahavikas Aghadi government