एसटीला मिळेनात प्रवासी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

प्रवासी वाहतुकीतून एसटी आगाराला रोजचे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यांत एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत एसटीचे सुमारे एक ते दीड कोटींचे उत्पन्न बुडाले. जूनमध्ये लॉकडाउनमधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली.

श्रीरामपूर  : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळात सर्व क्षेत्रांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यातून लाल परीही सुटली नाही. एसटी महामंडळाच्या येथील आगारालाही लॉकडाउनमध्ये तब्बल एक ते दीड कोटींचा फटका बसला. आता लॉकडाउनमधून शिथिलता देत नियम व अटी घालून एसटी वाहतुकीला परवानगी मिळाली असली, तरी प्रवासी नसल्याने एसटीच्या तोट्यात भरच पडत आहे. 

हेही वाचा ः अतिक्रमणांनी ओढ-नाले केले गायब

एसटीच्या येथील आगारात 65 बस आहेत. गॅरेज व कार्यशाळा आहे. तालुक्‍यासह जिल्ह्यात व बाहेरील जिल्ह्यात एसटीद्वारे प्रवाशांची ये-जा होत असते. प्रवासी वाहतुकीतून एसटी आगाराला रोजचे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यांत एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत एसटीचे सुमारे एक ते दीड कोटींचे उत्पन्न बुडाले. जूनमध्ये लॉकडाउनमधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली.

सोशल डिस्टन्सिंगसह नियम व अटी लादून एसटीच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाली. पूर्वीच्या 55 ऐवजी एका शीटवर एक, अशा केवळ 25 जणांनाच प्रवासाची सूचना देण्यात आली. असे असले तरी कोरोनाच्या धास्तीने अजूनही प्रवासी एसटीत बसायला तयार नाहीत. 

अवश्य वाचा ः बाप-लेकीवर तरसाचा हल्ला, दोघे गंभीर जखमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च, एप्रिल व मे महिन्यांत उत्पन्न मिळाले नाही. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यावरही येथील आगारातून बाहेर जाणाऱ्या, तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. एखाद-दुसरा प्रवासी एसटीत बसलेला दिसत आहे. प्रवाशांअभावी एसटीचे चाक आणखी रूतत आहे.

एसटीने मे व जून महिन्यांचे वाहक, चालक, तसेच इतर अधिकारी-कामगारांचे पगार 50 टक्के कमी केले. त्यामुळे कामगारांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. अनेक कामगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्ज काढले आहे. कामगारांना त्यांच्या पगाराची पूर्ण रक्कम अदा करावी, अशी मागणी होत आहे. 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येथील आगारातून दरवर्षी यात्रा विशेष बस सोडल्या जात. अनेक भाविक एसटीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात. परंतु धार्मिकस्थळी यात्रोत्सवावर बंदी असल्याने आषाढी यात्राही बंद आहे. आज येथील आगारातून एकही बस पंढरपूरला गेली नाही. दरवर्षी यात्रा विशेष फेऱ्यांतून एसटीला मिळणारा महसूल यंदा बुडाला. 
- ऋषिकेश शिवदे, आगारप्रमुख, श्रीरामपूर  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST waiting for passengers