
बाजार समितीच्या भाजीपाला लिलावात आज कोबी, फ्लॉवर, टोमॅटोसह बटाट्याची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली.
श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे परदेशातील खाद्यतेलाची आयात बंद होती. त्यामुळे तेलाच्या किंमती गगणाला भिडल्या होत्या. मात्र, आता परदेशातून खाद्यतेलाची आवक सुरळीत झाल्याने, तेलाच्या किंमती किलोमागे दहा रुपयांनी कमी झाल्या आहेत.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
मागील काही महिन्यांत खाद्यतेलांचे दर शंभरीपार गेले होते. परंतु, जानेवारीअखेर पामतेलासह इतर खाद्यतेलांच्या किंमतीत 10-15 रुपयांनी घटल्याचे येथील खाद्यतेल विक्रेते मुकेश न्याती यांनी सांगितले. पुढील काळात तेलाच्या किंमती स्थिरावणार असल्याचेही ते म्हणाले. पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, शेंगदाणा आणि करडीचे तेल प्रतिकिलो 10-15 रुपयांची उतरले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बाजार समितीच्या भाजीपाला लिलावात आज कोबी, फ्लॉवर, टोमॅटोसह बटाट्याची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली. गेल्या महिन्यापासून तालुक्यातील अनेक भागातून शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. मागणीपेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक होत असल्याने कोबी, फ्लॉवरच्या दरात विक्रमी घट झाल्याचे दिसते. अर्थात त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. मेंथीसह कोंथिबीरीच्या दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ झाली असली, तरी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बटाट्यासह इतर भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत.
हे ही वाचा : कोविड लसीकरणास कोपरगावमध्ये प्रारंभ
हिरवा वाटाणा 20-25 रुपये किलो, हिरवी मिरची 40-50 रुपये किलो विकत आहे. शहरासह ग्रामीण भागात सध्या गवारची आवक नसल्याने त्यास 80-90 रुपये प्रतिकिलोचा दर मिळला. भाजीपाल्याची आवक वाढल्याने पुढील महिनाभर भाजीपाल्याचे दर कमी राहणार असल्याचे बाजार समितीचे कर्मचारी अनिल पुंड यांनी सांगितले.
गेल्या महिनाभरात बासमती तांदळासह विविध तांदळाच्या दरात सरासरी पाच-सहा रुपयांनी वाढ झाली. दरवर्षी तांदूळ उत्पादन झाल्यानंतर सरासरी पाच रुपयांनी दर खाली येतात. परंतु, यंदा तांदळाची पाच-सहा रुपयांनी दरवाढ झाल्याचे दिसते. मागील 10 वर्षांनंतर यंदा प्रथमच चीनने भारतीय तांदळाची आयात केली आहे. चीन हा दरवर्षी इतर देशांमध्ये तांदळाची निर्यात करतो. परंतु, यंदा चीनला भारतीय तांदळाची आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीचा तांदळास फटका
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिक नवीन तांदळाचा तुकडा पडत आहे. त्यामुळे उत्तम दर्जाच्या तांदळाचे दर वाढत असून, पुढील काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता येथील ठोक तांदूळ विक्रेते महेश लुकड यांनी वर्तविली. बासमतीसह मदर इंडिया, इंद्रायणी, कोलम तांदूळ पाच-सहा रुपये प्रतिकिलो महागला आहे.