गुरे चारण्यासाठी शेतात गेला तो आलाच नाही, विहिरीजवळ पडलेली होती चप्पल व मोबाईल

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 21 January 2021

खानापूर येथील रवींद्र दशरथ धाडसे (वय ३८) या खानापूर येथील शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. जिरायत पातूर भाग २ मधील सुनंदा महादेव शेवलकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज, बुधवार, ता.२० जानेवारीला सकाळी उघडकीस आली.
 

पातूर (जि.अकोला) : खानापूर येथील रवींद्र दशरथ धाडसे (वय ३८) या खानापूर येथील शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. जिरायत पातूर भाग २ मधील सुनंदा महादेव शेवलकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज, बुधवार, ता.२० जानेवारीला सकाळी उघडकीस आली.

या घटनेची हकीकत अशी की, रवींद्र दशरथ धाडसे हा युवक गुरे चारण्यासाठी म्हणून घरून निघून गेला. तो घरी परतलाच नाही. म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

दरम्यान, सकाळी शेतमालक शेवलकार आपल्या शेतात आल्यावर त्यांना त्यांच्या विहिरीवर चप्पल व मोबाईल आढळून आला. त्यांना आपल्या विहिरीत कोणीतरी आत्महत्या केल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशन पातुरला माहिती दिली.

तेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतक रवींद्र धाडसे याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह सास संघटनेचे प्रमुख दुलेखा युसूफ खा, सदस्य राहुल वाघमारे, शेख रफिक शेख रशीद, त्र्यंबक सदार, भारत वजाळे, गुलाब धाडसे, शेख वसीम शेख नसीर यांच्या अथक परिश्रमाने प्रेत विहिरीबाहेर काढले.

हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला

पोलिसांनी पंचनामा करून मृतक रवींद्र धाडसे यांचा मृत शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतक रवींद्र याला चार आपत्य असून, तीन मुले व एक मुलगी आहे. त्यातील एक मुलगा व एक मुलगी अपंग असून, पत्नी व म्हातारी आई आहे.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

प्राप्त माहितीनुसार रवींद्र व त्याच्या आईवर बँकेचे कर्ज असून, सततची नापिकी, कर्जबाजरीपणा व अपंग मुलांचे पालन पोषण याला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi New Debt-ridden farmers son commits suicide