
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आवाहनावर शहरातील वाहतूक पोलिसांच्या वतीने ‘नो मास्क नो सवारी’ अभियान चालू करण्यात आले. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनचाकांकडून नियमांचे पालनही होऊ लागले. प्रत्येक खासगी ऑटो प्रवासी वाहनांवर त्याउद्देशाने काही स्टिकरही लावण्यात आले.
अकोला : ‘नो मास्क नो सवारी’ हे अभियान गत दोन-अडीच महिन्यांपासून वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने शहरात राबविण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद म्हणून काही दिवस कडक नियमांवर खासगी वाहनचालकांनी वाहन चालविले. कोणत्याही सवारीला मास्क नसल्यास त्यांना ऑटो किंवा इतर वाहनात बसू दिले जात नव्हते किंवा सक्तीने नागरिकांना मास्क बांधण्यास सांगण्यात येत होते. ऑटो चालकांकडून मोजक्याच सवाऱ्या घेण्यात येत होत्या. परंतु, जस-जसा वेळ गेला तस-तसा नियमांना विसर पडला असून ऑटो चालक बिनधास्त विना मास्क सवाऱ्या शहरात फिरताना दिसत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोनाचा आणखी उद्रेक होणार, हे मात्र निश्चितच.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आवाहनावर शहरातील वाहतूक पोलिसांच्या वतीने ‘नो मास्क नो सवारी’ अभियान चालू करण्यात आले. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनचाकांकडून नियमांचे पालनही होऊ लागले. प्रत्येक खासगी ऑटो प्रवासी वाहनांवर त्याउद्देशाने काही स्टिकरही लावण्यात आले.
पोलिसांकडून दंड होणार या भीतीने वाहनचालक प्रवासी नागरिकांना सक्तीने मास्क लावण्यास सांगत होते. कोणत्याही नागरिकांना मास्क नसल्यास त्यांना वाहनात प्रवेश मिळत नव्हता. मास्क नसल्याने आपल्याला वाहनात प्रवेश नसल्याच्या भीतीने प्रवासीही आवर्जुन मास्क, दुपट्ट्याचा उपयोग करत होते. त्यामुळे भीती पोटी का होईना, प्रवासी नागरिकांकडून मास्कचा वापर होताना दिसत होते. परंतु, जस-जसा काळ उलटत गेला तस-तसा या अभियानाला वाहन चालक, प्रवासी नागरिक व वाहतूक पोलिसांना विसर पडत असल्याचे दिसत आहे.
शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांसोबतच आता खासगी प्रवासी वाहनात विना मास्त प्रवास करताना नागरिक दिसत आहेत. त्याचबरोबर वाहनचालकही मास्क वापरत नसल्याने ते सुद्धा प्रवासी नागरिकांवर मास्कची कुठल्याही प्रकारचे बंधन लावत नाहीत त्यामुळे वाहनचालकांकडूनच अभियानाला फाटा देण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे प्रशासनाचेही लक्ष असणे तेवढे गरजेचे आहे. अन्यथा शहरात कोरोनाचा पुन्हा स्फोट होण्यास वेळ लागणार नाही. अशीच नियमांची फजेती होत राहिली तर, कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून शहराचे नाव घेतले जाणार यात काही शंका नाही.
ऑटो चालकांकडून होत आहे लूट
आधी शहराच्या कुठल्याही परिसरातून ऑटोमध्ये बसल्यास बस स्थानक, टॉवर चौकापर्यंत प्रवास केल्यास १० रूपये प्रमाणे भाडे घेतल्या जात होते. परंतु, कोरोनाच्या काळापासून तेच भाडे डबलने वाढवून प्रवाशांची लूट ऑटो चालक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे म्हणून फक्त तिन प्रवासी बसविण्याची अट लावण्यात आली होती. तेव्हा नागरिकांनीही २० रूपये प्रमाणे भाडे दिले होते. आज परिस्थितीत बदल झाला आहे. आता तीन प्रवाशांच्या एवजी ऑटोत कोंबून प्रवासी भरल्या जात आहेत. तरी, देखील २० रूपया प्रमाणे भाडे वसुल केल्या जात असून ही प्रवासी नागरिकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
दुकानांवरही होत आहे गर्दी
जस-जसा काळ उलटत आहे तस-तसा कोरोना नियमांची फजिती होत असताना दिसत आहे. शहरातील मोजके प्रतिष्ठाण (दुकाने) सोडल्यास कुठल्याही प्रतिष्ठाणावर कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि विना मास्क हा मुख्य मुद्दा आहे. बाजाराच्या दिवसी परिसरातील नागरिकांना जणू मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा विसरच पडत आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठाण मालकांकडून देखील त्यांना कुठल्याही प्रकारचे बोलल्या जात नाही. त्यामुळे प्रतिष्ठाणांवर विना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता नागरिक दिसत आहेत. याकडे आरोग्य विभागानेही लक्ष द्यायला पाहिजे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -
पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!
उद्ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती
तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची
शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!