कुरबुर टाळण्यासाठी ‘टूरटूर’चा पर्याय, पळवापळवी टाळण्यासाठी निघाले ग्रामपंचायत सदस्य पर्यटनाला

Akola Marathi News Sarpanchpadas rush begins; Went on a member tour
Akola Marathi News Sarpanchpadas rush begins; Went on a member tour

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुका पार पडल्या आता. लगीनघाई असेल ती सरपंचपदाच्या निवडणुकीची. त्यासाठी लागणारी सदस्यांची जुळवाजुळवा म्हणजे कसरत असून, या राजकीय कसरती म्हणजे सदस्यांची जुळवणूक व त्यांच्या रंजन अन् सुरक्षीततेसाठी पर्यटनाला आता सुरूवात झाली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका साधारणतः पॕनल पद्धतीने लढविल्या जातात. जातीय समीकरणे हा कुठल्याही भारतीय निवडणुकीचा अविभाज्य घटक असतो. तसा तो ग्रामपंचायतीतही आहे. इतःपरही राजकीय फक्ष आपली लेबले चिकटवतातच. मूर्तिजापूर तालुक्यातील २९ पैकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली.

२७ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊन निकाल लागले. राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे सुद्धा झाले. एखाद्या राजकीय पक्षाने आपले पॕनल म्हणून केलेला दावा त्यांचा दावा, त्या पॕनलमधील काही अन्य संघटनांचे उमेदवार बघून फोलही ठरविल्या गेला.

या दाव्या-प्रतिदाव्यांचे कवित्व संपतही नाही, तर सर्वांना वेध लागले सरपंचपदाच्या निवडणुकीचे, सरपंचपदांचे यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण रद्द झाले आहे. नवीन सोडत प्रक्रिया अद्याप निश्चित व्हायची आहे.

मात्र जुळवाजुळव सुरू झालेली आहे. सरपंचपद व उपसरपंच विशिष्ट कालावधीसह वाटून घेणे, काही 'व्यवहार' पार पडणे, काही कामांची अभिवचने घेणे-देणे, अशा पद्धतीने सरपंच पदासाठी समिकरणे जुळविण्यास सुरूवात झाली आहे.

अशी जुळवून आणलेली समीकरणे तुटण्याची शक्यता विचारात घेऊन सदस्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाण्याची एक पद्धत आहे. त्यायोगे सदस्य सुरक्षित रहातात. पर्यटनादरम्यान त्यांचे रंजन होऊन ते ‘पक्के’ही होतात. अन्य पॕनलवाल्यांच्या प्रलोभनांना बळी पडण्यासाठी ते उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या गळाला सापडत नाहीत.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

राजकीय कुरघोड्या सुरू
सरपंचपदांचे नवीन आरक्षण लवकरच जाहीर होण्याची शक्यता विचारात घेऊन या तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या हातगाव ग्रामपंचायतीच्या १३ नवनिर्वाचित सदस्यांपैकी सात सदस्य पर्यटनाला निघून गेले आहेत. कदाचित हा प्रथम टूर असू शकतो. टूरटूर थांबविण्यसाठी आरक्षण घोषणेला विलंब लागल्या आणखी एखादा टूर निघू शकतो.

परंतु या 'टूर' मध्ये सहभागी सदस्य एका नव्हे, तर दोन पॕनलसह दोघा अपक्षांचा समावेश असणारे आहेत. या निवडणुकीत एका पॕनलला ६, दुसऱ्याला ५ पाच जागा मिळाल्याचा त्यांचा दावा असून, आपल्या ५ सदस्यांसह दोघा अपक्षांना घेऊन एक पॕनल प्रमुख पर्यटनाला गेले आहेत. ठरलेले समीकरण गुलदस्त्यात आहे. सर्वाधिक ६ सदस्य विजयी झालेल्या पॕनलला बहूमताच्या अधिक जवळ असूनही सत्तेपासून दूर रहावे लागते की समिकरणे बदलविण्यात ते यशस्वी होतात, यासाठी सरपंचपदाच्या निवडणुकीचा दिवस उजाडावा लागेल.

(संपादन - विवेक  मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com