अकोला: डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे.
वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो.
मात्र, असे असले तरी या डोंगर दऱ्यांमध्ये अनेक आश्चर्य दडलेली आहेत. आता हेच पहा ना!
अकोला जिल्ह्यातील आकोटवरून चिखलदऱ्याकडे जायचं असेल तर मोठा जंगली रस्ता. जंगल लागताच ‘चिलम्यादेव’ दिसतो. त्याचं नाव चिलम्या असल्यामुळे आणि चिलीम कालबाह्य झाल्यामुळे लोक त्याच्या तोंडात विडी किंवा सिगारेट ठेवतात.
अर्थात हाही देव जंगलपुत्रांचाच! शेवटी माणसं स्वत:चं प्रतिबिंब देवात शोधत राहिलेली आहेत.
म्हणून तर महादेव गांजा पितो, कारण लोकांना तो हवा असतो. महादेव आणि पार्वती अशीच साध्या लोकांसारखी वागतात. संसार थाटतात. भांडतात. गिरजा पाणी भरते. तिला शंकर काम सांगतो. अशी सगळी गंमतच गंमत.
सातपुडा वनराईला धोका पोहचू नये म्हणून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या हिवरखेड तुकईथड मार्गावर अकोला अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर सुमारे २ मीटर परीघ असलेला पाषाण "तेल्यादेव" म्हणून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे.
तेल्यादेवाला तेल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अभिषेक करून श्रद्धाळू परंपरा जोपासत आहेत तर तेल्यादेव सातपुडा रक्षक म्हणून आपली भूमिका बजावतोय.
वाटसरूंचा रक्षक
कित्येक आदिवासी बांधव तसेच व्यापारी याच मार्गाचा वापर अमरावती जिल्हा तसेच मध्यप्रदेश राज्यात जाण्यास करतात. या ठिकाणावरून ये-जा करणारे मार्गस्थ आपल्या जवळील तेल व तंबाखूजन्य पदार्थ बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा या ठिकाणी अर्पण करुन पुढे रवाना होतात.
आजही होते जुन्या परंपरांचे पालन
ही प्रथा फार प्राचीन आहे. तेल्यादेवला तेल, तंबाखू, विडी चढवल्याने जंगलातील पुढील मार्गात अडथडा येत नाही, किंवा कुठला धोका होत नाही असा समज या भागांतील नागरिकांचा आहे. जुन्या काळात दळणवळणासाठी ज्या वेळी बैलगाडी शिवाय कुठलीच वाहन सुविधा नव्हती तेंव्हा पासून ही प्राचीन प्रथा आदिवासी समुदायासह प्रवासी अंधश्रध्देतून आजही पालन करीत आहेत.
तेल्यादेवाला हवी, बिडी, सिगारेट अन् तंबाखूही
बिडी, सिगारेट चा वापर सातपुडा जंगलात केल्याने अनेकदा आग लागून वनराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परंतु या मार्गावरील प्रवासी तेल्यादेव या ठिकाणावर बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ अर्पण करत असल्याने आगीच्या घटनांना आळा बसत आहे.
वनराईचा रक्षक
या प्रथेमागे अंधश्रद्धा असली तरी यामुळे अभयारण्यातील वातावरण प्रदुषित होण्यापासून वाचत आहे, असं मत वन्यप्रेमी तुलसीदास खिरोडकार यांनी व्यक्त केले आहे. अज्ञातातून अनेकवेळा अंधश्रद्धा निर्माण होत असते, त्यातून अनेकांची फसवणूक सुद्धा होते. परंतु तेल्यादेव मागची श्रद्धा कुणाला फसवणारी नाही. तर विडी, आगपेटी, तंबाखू अश्या वस्तू तेल्यादेवला अर्पण केल्याने तेथून ये-जा करणाऱ्यांना सुरक्षितता वाटते.
या बरोबरच तेल्यादेवाच्या श्रद्धेतून कुणाची फसवणूक होत नाही, त्यामुळे अनिसचाही या आक्षेप नाही. उलट वनराई वाचवण्याबरोबरच व्यसनमुक्तीसाठी तेल्यादेवचा जास्त उपयोग झाला पाहिजे असं मत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रवक्ता पुरुषोत्तम आवारे यांनी व्यक्त केले.
व्यसनमुक्तीसाठी ठेवा श्रध्दा
तेल्यादेवापुढे विडी, आगपेटी, तंबाखू अश्या वस्तू अर्पण केल्याने न कळत वनराईची सुद्धा सुरक्षितता अबाधित राहते, अश्या ह्या तेल्यादेवावर व्यसनमुक्तीसाठी जरी श्रद्धा ठेवली तर खऱ्या अर्थाने ही श्रद्धा सार्थकी ठरू शकेल.
(संपादन - विवेक मेतकर)