मास्क घातला नाही म्हणून दोन हजार वाहन चालकांवर करण्यात आली कारवाई

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 21 October 2020

 कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क नो सवारी, नो मास्क नो राईड’ ही मोहीम अकोला वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. त्यानंतर आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७८ ऑटो व १४२५ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क नो सवारी, नो मास्क नो राईड’ ही मोहीम अकोला वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. त्यानंतर आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७८ ऑटो व १४२५ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्या होता. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गर्दीचे ठिकाणे हेरून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यांनी ‘नो मास्क नो सर्व्हिस’ हा उपक्रम सुरू केला.

त्या अंतर्गत ‘नो मास्क नो पेट्रोल’, ‘नो मास्क नो बुक्स’, ‘नो मास्क नो राशन’ असे उपक्रम सुरू केले. त्याला मिळालेला प्रतिसाद बघता त्यानंतर शहरातील चालणाऱ्या ऑटोची प्रचंड संख्या लक्षात घेवून ‘नो मास्क नो सवारी’ ही मोहीम २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत ऑटो चालकाला व प्रवाशांना मास्क आवश्यक करण्यात आले.

त्याबाबत ऑटो चालकांचे प्रत्येक ऑटो स्टँडवर जाऊन प्रबोधन केले. ‘नो मास्क नो सवारी’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे स्लोगन लिहलेली पोस्टर्स चिपकविण्याची मोहीम सुरू करण्यात आला. आतापर्यंत जवळपास तीन हजार ऑटोवर असे पोस्टर्स चिपकविले आहे. निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली.

आतापर्यंत एकूण ७५८ ऑटोवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या एकूण १४२५ दुचाकीवर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे. विविध संघटनांनी पुढाकार घेऊन दिलेल्या जवळपास दोन हजार मास्कचे वितरणसुद्धा शहर वाहतूक शाखेने केले आहे.

दंडात्मक कारवाया करणे किंवा महसूल जमा करणे हा उद्देश या मोहिमेचा नसून, कोरोनाचे संक्रमण आणखी वाढू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना मास्क घालण्याची सवय लागावी हा या मोहिमेचा उद्देश आहे.
- गजानन शेळके, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Action was taken against 578 auto and 1425 two-wheeler drivers for not wearing masks