वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 11 November 2020

उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खासगीकरण नकाे, या मागणीसाठी लढा देत असलेल्या महिलांना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही दिली आहे

अकोला  ः उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खासगीकरण नकाे, या मागणीसाठी लढा देत असलेल्या महिलांना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अशी ग्वाही दिली आहे.

केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या उमेद अभियानात राज्यभरातील जवळपास ५० लाख महिला जोडल्या गेल्या आहेत.

राज्यात ३५०० ते ४००० हजार कर्मचारी अभियानात कार्यरत आहेत. महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी अभियानाने समर्पित कर्मचारी व अधिकाऱ्यांची कंत्राटी स्वरूपात भरती केली आहे.

८ ते १० वर्ष शासनाला आपली सेवा दिल्यानंतर अचानक कार्यमुक्त केल्याने हे कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यामुळे उमेद अभियानाचे होत असलेले खाजगीकरण थांबविण्यासाठी बचत गटांच्या महिला व पुरुषांनी राज्यात आंदोलने केली आहेत.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उमेद अभियानाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात महिलांनी भेट घेतली. त्यावर ॲड. आंबेडकर यांनी निश्चितच मदत करुन स्वत: या विषयावर शिष्टमंडळालासोबत घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जि.प. अध्यक्षा प्रतिभा भाेजने, अनिल शेरेवार, पवन आडे, मुरलीधर राखोंडे, प्रमोद बोबडे, संदेश मस्के, हर्षद बुरबुरे, रुक्साना परवीन, सुनयना दाते, छाया मानकर, पुष्पा निलखन, अश्विनी चोंडके, दुर्गा चंदिवाले, निलीमा वानखडे, सुवर्णा डांबलकर, दुर्गा वाघमारे, नलिनी विटकरे, ज्योती साखरे, तेजस्वीनी आवटे आदी उमेदच्या महिला व कर्मचारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Adv. Prakash Ambedkar will hold discussions with Chief Minister Uddhav Thackeray