esakal | तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bizarre accident of three vehicles, one killed

ट्रक, दुचाकी व पिकअप या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आल्याची माहिती आहे.

तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : ट्रक, दुचाकी व पिकअप या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आल्याची माहिती आहे.


महिंद्रा पिकअप चालक सुनील राउबा धनवे (रा. वालसावंगी ता. भोकरदन) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी व अनिल पांडुरंग वाघ हे दोघे जण रविवारी (ता.८) महिंद्रा पिकअप एम.एच. २८ एच. ८५२० या मालवाहू वाहनातून वालसावंगी येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला अकोला येथे विकण्यासाठी घेऊन गेले होते.

दोघांनी हराशीमध्ये भाजीपाला विकून रात्री मोताळा-बुलडाणा मार्गावरून घराकडे परत जात होते. त्यांच्या पिकअप समोर दुचाकी एम.एच. २८ बी.जे. ३५९४ या वाहनावर भूषण मुरलीधर कुटे (२५, रा. तेल्हारा ता. चिखली) व अजय आवरकर (३०, रा. बुलडाणा) हे दोघे जण बुलडाण्याकडे जात होते. दरम्यान, राजूर घाटात समोरून येणाऱ्या ट्रक एम.पी. १४ एच.सी. १११५ या भरधाव वाहनाने सदर दुचाकीला धडक दिली.

सोबतच ट्रक चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने ट्रक पलटी झाला. त्यामुळे दुचाकीवरील दोघे जण दुचाकीसह ट्रकच्या मागील बॉडीखाली दबले. तर, महिंद्रा पिकअप गाडी ट्रकच्या कॅबिन खाली दबली. दरम्यान, नागरिकांनी जखमींना ट्रक खालून बाहेर काढले असता, भूषण मुरलीधर कुटे हा जागीच ठार झाला होता. तर, त्याचा सहकारी अजय आवरकर हा गंभीर जखमी झाला. तसेच पिकअप मधील सुनील धनवे व अनिल वाघ हे दोघे जण जखमी झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. अजय आवरकर याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अनिल भुसारी, पोहेकाँ नंदकिशोर धांडे, पोकाँ गणेश बरडे, गणेश वाघ, मंगेश पवार, विजय पैठणे, शिवाजी मोरे, चालक एएसआय शेख मुस्तकीम व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतक युवकाच्या मृतदेहाचे सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पीएसआय अशोक रोकडे यांची उपस्थिती होती. या प्रकरणी पिकअप चालक सुनील राउबा धनवे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे करीत आहेत.

आरोपी ट्रक चालक फरार
अपघात झाल्यावर आरोपी ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर ट्रकमध्ये सरकी भरलेली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहे. वृत्त लिहिपर्यंत आरोपी फरार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top