राजकीय मेळावे साजरे मात्र पालखी मिरवणुकीला पडला खंड

मुशीरखान कोटकर
Tuesday, 3 November 2020

प्रती तिरुपती श्री. बालाजी महाराज यांचा तीनशे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेल्या धार्मिक उत्सवाला कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने खंड पडला. लाटा मंडप उभारला गेला नाही.

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) ः प्रती तिरुपती श्री. बालाजी महाराज यांचा तीनशे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेल्या धार्मिक उत्सवाला कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने खंड पडला. लाटा मंडप उभारला गेला नाही.

पालखी मिरवणूक निघाली नाही. ललित साजरा होणार नाही. एकीकडे राजकीय दसरा मेळावा साजरे झाले; मात्र तिरुपतीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या येथील श्री व्यंकटेश बालाजी महाराजांचे सर्व धार्मिक उत्सवाला परवानगी नसल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

राज्यात सर्वत्र यात्रा उत्सव आणि धार्मिक उत्सवाला बंदी असल्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाने बालाजी यात्रा उत्सव रद्द केली. कोरोना या जीवघेण्या संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून प्रशासनाने बालाजी यात्रोत्सव दरम्यान होणाऱ्या धार्मिक उत्सवाला परवानगी नाकारली. श्री बालाजी संस्थानचे वर्षे पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा प्रशासनाकडे विनंतीपूर्वक बाजू मांडली.

याचबरोबर पालक मंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांनी बालाजी मंदिराला भेट देऊन होणाऱ्या उत्सवा संदर्भात माहिती घेतली.

यादरम्यान त्यांनी सकारात्मक भावना व्यक्तही केल्या. परवानगी मिळेल या अपेक्षेने संस्थांच्या माध्यमाने पालखी मिरवणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली. ऐनवेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्याच्या विनंतीला प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. परिणामी आमना नदीवर सीमोल्लंघनासाठी बालाजी महाराजांना एका वाहनात विराजमान करून मिरवणुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यात आले.

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात धार्मिक उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली तर अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसरा सणा निमित्त काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यात गर्दी झाली. मात्र साडेतीनशे वर्षात प्रथमच हा उत्सव साजरा होत नसल्याने बालाजी भक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दसरा मेळावा साजरे झाले; मात्र धार्मिक परंपरा खंडित झाल्याची खंतही व्यक्त होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Celebrations of political rallies, but the palanquin procession fell short