esakal | डोंगर कपारीतील छोट्याशा खेड्यात चालतो नकली नोटांचा गोरखधंदा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Counterfeit notes are rampant in a small village

मोताळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुऱ्हा गोतमारा या छोट्याशा गावातून नकली नोटांचा कारभार चालत असल्याचे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाच्या सतर्कतेने उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

डोंगर कपारीतील छोट्याशा खेड्यात चालतो नकली नोटांचा गोरखधंदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

धामणगाव बढे, (जि. बुलडाणा)  ः मोताळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुऱ्हा गोतमारा या छोट्याशा गावातून नकली नोटांचा कारभार चालत असल्याचे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाच्या सतर्कतेने उघड झाले आहे. 


मोताळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले कुऱ्हा गोतमारा हे छोटेसे गाव. या गावातील लोकांचे व्यवहार धामणगाव बढे येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चालतात. सोमवारी (ता.२६) दुपारी एक वाजता कुऱ्हा येथील ज्ञानेश्‍वर मगनसिंग पेले हा बँकेमध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आला. त्याने आपल्या सोबत २ लाख ६५ हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. या नोटांची बँकेतील मशीनद्वारे तपासणी केली असता यामध्ये दोनशे रुपयांच्या ३६५ नोटा होत्या.

यापैकी १८१ बनावट नोटा आढळून आल्या. ३६ हजार दोनशे रुपये किंमत असलेली ही रक्कम चलनात आणण्यासाठी नोटांमध्ये मिसळून आणल्याचे दिसून आले. बँक व्यवस्थापक राजेश सोनवणे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी घटनेची फिर्याद धामणगाव बढे पोलिसांना दिली.

यावेळी आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरू मगरेसे, राहुल गोटीराम साबळे व गोटीराम साबळे यांना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


नोटा आल्या कुठून?
कुरा गोतमारा या छोट्याशा गावात या बनावट नोटा कुठून आल्या. हे पोलिसांसमोर एक आव्हान उभे ठाकले आहे. या नोटांच्या चलनात आणण्याचा प्रयत्नाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत. यामध्ये किती जणांचा समावेश आहे, हे सर्व प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत.

या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी रमेश बरकते व बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश जाधव पुढील तपास करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image