
एकीकडे शासनाकडून लॉकडाउनच्या काळात शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देऊन नागरिकांना मोठा सहारा दिला होता. परंतु, अनुदानित सिलिंडरच्या अनुदानात मोठी कपात करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे.
अकोला : एकीकडे शासनाकडून लॉकडाउनच्या काळात शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देऊन नागरिकांना मोठा सहारा दिला होता. परंतु, अनुदानित सिलिंडरच्या अनुदानात मोठी कपात करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे.
ग्राहकांना वर्षातून मिळणाऱ्या अनुदानित १२ सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहेत. परंतु, लॉकडाउनपासून बुकिंग केलेल्या अनुदानित सिलिंडरच्या अनुदानात ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दोनशे रुपयापर्यंत जमा होणारे अनुदान आता फक्त चार ते पाच रुपयेच जमा होत असल्याने लॉकडाऊनचा फटका सामान्य नागरिकांनाच का, असा प्रश्न उपस्थित आहे.
सहाशे ते साडेसहाशे रुपये किमतीत मिळणाऱ्या प्रत्येक अनुदानित सिलिंडरच्या मागे किमतीनुसार ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात होते. परंतु, गत पाच-सहा महिन्यांपासून एका अनुदानित सिलिंडरची किमत ग्राहकांना जास्तीची मोजावी लागत आहे.
त्यातच घरपोच किंवा रस्त्याने जात असलेल्या सिलिंडरच्या गाडीतून बुकिंग केलेले सिलिंडर घ्यायचे असल्यास ५० ते ६० रुपयेही ग्राहकांना जास्तीचे मोजावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
अनुदानाच्या नावाने होत असलेली फसवणूक संबंधित अधिकाऱ्यांना थांबवावी. जने करून अनुदानाचा फायदा थेट ग्राहकांनाच मिळेल. उद्योगपती किंवा भले मोठे श्रीमंत असलेल्या व्यक्तींकडून अनुदानाच्या नावावर पैसे वसुल केले तर त्यांना काहीही फरक होणार नाही. परंतु, सामान्य नागरिकांना कबाळ कष्ठ करून पैसे जमा करावे लागतात.
सिलिंडरचे अनुदान नेमके का कमी केल्या गेले याचे स्पष्ट कारणही सांगण्यात येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधी नियमाने मिळत असलेली अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची विनंती ग्राहकांकडून होत आहे.
कर्मचारी देतात उडवाउडवीचे उत्तरं
आम्हाला मागच्या महिन्यात सिलिंडरचे अनुदान कमी का आले म्हणून काही गॅस विक्रेत्या कर्मचाऱ्यांना विचारले असता कोरोना निधी जमा होत आहे, तुम्ही एकटेच आहा काय?, सर्वच ग्राहक आम्हालाच विचारतात, मंत्र्यांना विचारा, आम्हची तक्रार द्या असे उलट-सुलट बोलून उडवा-उडवीचे उत्तरं देतात. ग्राहकांनाही जास्त वेळ नसल्याने याकडे लक्ष देत नाहीत. परंतु, काही नागरिकांमधून याविषयी ओरड होत असल्याचे दिसत आहे.
ग्राहकांना अजूनही ४५० रुपये किमतीचे सिलिंडर असल्याचा समज आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला किमतीमध्ये बदल होत असतो. अनुदानीत रक्कमवर जीसटी लागूनच रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे सिलिंडच्या अनुदानावर कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. आणि कोरोनामुळेत नक्कीच काही हेराफेरी झाली नाही. ग्राहकांनी याबाबत बेफिकर राहावे.
-विकास चोपडे, वितरक, विजय गॅस सर्व्हिस, अकोला.
(संपादन - विवेक मेतकर)