
अकोला जिल्हा बस स्थानकावर बॉम्ब असल्याचे वृत्त कळताच येथील सर्वामध्ये घबराट पसरली. सूचना मिळताच कर्मचारी, अधिकारी, सर्वसामान्य नागरिकांची बसस्थानका बाहेर जाण्यासाठी धावाधाव झाली.
अकोला: सकाळी 11.30 वेळ...ठिकाण अकोला बसस्थानक...विकएन्डचा दिवस अन् गजबजलेला परिसर अशातच अचानक श्वान पथक आणि बॉम्ब शोधक, नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक येऊन धडकते ...एव्हाना बस स्टँडमध्ये बॉम्ब असल्याची वार्ता शहरभर पसरते. वरिष्ठ पोलीस अधिकारीही बसस्थानकावर दाखल होतात. बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये भीती पसरते. अकोला शहरातील मुख्य बस स्थानकात पोलीस अधिकारी अन् कर्मचार्यांची वाहने मोठ्या वेगात येतात आणि फिल्मी स्टाईलने पोलीस कर्मचारी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक शोध घ्यायला सुरुवात करतात. हे पोलिसांचे मॉक ड्रील असले तरी एकाचवेळी पोलिसांची अनेक वाहने शहरात दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा अन् अफवा होते मात्र काही वेळातच ही पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे पुढे येते आणि अकोलेकरांनी तसेच बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडतात. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील बसस्थानकात पोलिसांची मॉक ड्रिल झाली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच अकोला येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथकासह पोलिसांनी बसस्थानकाला वेढा घातला. बॉम्बचा शोध सुरू झाला. नेमके काय झाले, हे कुणालाही कळत नव्हते. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढत होती. कुणी तरी बॉम्ब असल्याचे सांगितले. ही वार्ता शहरभर पसरली. अनेकांची यामुळे धांदल उडाली पोलिसांची मॉक ड्रिल असल्याचे माहीत झाल्यानंतर अनेकजण परतले. परंतु, तोपर्यंत तेथे उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. शहरात याच वेळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. कुणी भांडण तर कुणी तणाव झाल्याचे सांगत होते. शहरात मॅसेजही फिरायला लागले होते. परंतु, काही वेळातच ही कारवाई म्हणजे सरावाचा भाग असल्याचे सांगितले. तब्बल अर्धातास हे मॉक ड्रिल सुरू होते. अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हे मॉक ड्रील करण्यात आले असून, जिल्ह्यात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी पोलीस तयार असल्याचे या माध्यमातून सांगण्यात आले. अकोल्यातील मुख्य बस स्थानावर शनिवारी नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना अकस्मात वाजलेल्या भोंग्याने प्रवासी, कर्मचाऱ्यांसह काही कामानिमित्त आलेले नागरिक भीतीने धास्तावले. अकोला जिल्हा बस स्थानकावर बॉम्ब असल्याचे वृत्त कळताच येथील सर्वामध्ये घबराट पसरली. सूचना मिळताच कर्मचारी, अधिकारी, सर्वसामान्य नागरिकांची बसस्थानका बाहेर जाण्यासाठी धावाधाव झाली. नंतर सुरक्षा यंत्रणेने दहशतवादाचा खात्मा केल्याचा वेगवान थरार पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार म्हणजे म्हणजे रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. |