हे कसं काय? जुलै महिन्यापासून डाळ शिजलीच नाही हो!

सुगत खाडे  
Monday, 7 September 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य गटासह अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो मोफत हरभरा डाळीचे वाटप करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु लाभार्थ्यांना अद्याप जुलै महिन्यापासून मोफत डाळीचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या डाळीची प्रतीक्षा लाभार्थी करत असून, शासनाची डाळ शिजत नसल्याचे दिसून येत आहे.

अकोला : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य गटासह अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो मोफत हरभरा डाळीचे वाटप करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु लाभार्थ्यांना अद्याप जुलै महिन्यापासून मोफत डाळीचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या डाळीची प्रतीक्षा लाभार्थी करत असून, शासनाची डाळ शिजत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवण्यात येत आहे. सदर योनजेअंतर्गत प्राधान्य गटासह अंत्योदय योजनेतील गरीब लाभार्थ्यांना नियमित अन्न धान्याव्यतिरीक्त प्रति माह प्रति व्यक्ती पाच किलोग्रॅम तांदुळ व प्रतिमाह प्रति शिधापत्रिका १ किलो तूर किंवा हरभरा या दोन डाळींंपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करण्याचे शासनाने जाहीर केले होते.

अकोला जिल्ह्याीतील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याअंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत मोफत हरभरा डाळीचे वाटप करण्यात आले. परंतु त्यानंतर जुलै महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत मात्र डाळीचे वितरण रखडले आहे. त्यामुळे प्राधान्य व अंत्योदय गटातील लाभार्थी मोफत डाळीपासून वंचित असून त्यांना शासनाच्या उदासीनतेचा फटका बसत आहे.

हेही वाचा- बापरे! दारूसाठी पैसे नाही म्हणताच डोक्यात घातली कुऱ्हाड

सोयीसाठी फिरवला होता शासन निर्णय यापूर्वी शासनाने अख्खा हरभरा वितरीत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु अख्खा हरभरा येवजी लाभार्थ्यांना डाळीचे वाटप करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना मोफत अख्खा हरभरा देण्यायेवजी हरभरा डाळीचे मोफत वाटप करण्यास मंजुरी दिली होती. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तवर शासन निर्णय फिरवल्याने त्याचा फायदा गरीबांना होणार आहे.

हेही वाचा- अरे बापरे! चक्क महापौरांनाच झाली कोरोनाची बाधा

जिल्ह्यासाठी ३०८ मेट्रीक टन हरभरा डाळ
प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मोफत हरभरा डाळीचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यासाठी ३०८ मेट्रीक टन डाळीचा साठा मंजुर करण्यात आला होता. प्राधान्य गटातील ११ लाख २९ हजार ३४० लाभार्थी व ४५ हजार ९२३ अंत्योदय गटातील कार्डधारकांना त्याचा मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना लाभाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

माहे जुलै ते सप्टेंबरसाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत हरभरा डाळीचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. शासन स्तरावरुन डाळ उपलब्ध झाली आहे.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Distribution of free pulses stalled since July