
महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी कोणतेही कार्यालय उघडले नाही.
अकोला ः महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी कोणतेही कार्यालय उघडले नाही.
अखेर प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर सहाव्या वेतन आयोगातील थकित रकमेतून प्रत्येकी २० हजार रुपये कर्मचारी व निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारी जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयानंतर कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम व नियमित वेतन,निवृत्ती वेतन थकीत आहे. ते दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळावे, यासाठी मनपा कर्मचारी संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार मंगळवारी सकाळी कोणतेही कार्यालय उघडण्यात आले नाही. आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना येत्या सोमवारी प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी दुपारी १२.३० वाजता संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा केली.
वसुली करा वेतन घ्या!
मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मात्र अनुत्तरीत ठेवण्यात आला. दिवाळीपूर्वी मालमत्ता कराची वसुली करा. त्यातील सर्व निधी वेतनासाठी खर्च करण्यात येईल, असे आयुक्तांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे मलामत्ता कराच्या वसुलीवरच दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन मिळणार किंवा नाही, हे अवलंबून राहील.
संप संपल्यानंतरही दिवसभर कार्यालय बंदच
मनपा कर्चमाऱ्यांच्या संपावर दुपारी १२.३० वाजताच तोडगा निघाला. दुपारी १.३० वाजतानंतर कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात यावे, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतरही दिवसभर मनपा मुख्यालयातील उपायुक्तांसह बहुतांश कार्यालय बंद होते. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये संप मागे घेण्यावरून मतभेद दिसून आलेत.
(संपादन - विवेक मेतकर)