कोविड केंद्रात नको, घरीच जाऊ द्या, ७६ रूग्णांची गृहविलगीकरणाला पसंती

दीपक पवार
Wednesday, 30 September 2020

कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या तसेच फारसा त्रास नसलेल्या रूग्णांसाठी जिल्ह्यात गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार कारंजा तालुक्यातील ७६ रूग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कारंजा -लाड (जि.वाशीम) ः कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या तसेच फारसा त्रास नसलेल्या रूग्णांसाठी जिल्ह्यात गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार कारंजा तालुक्यातील ७६ रूग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कारंजा तालुक्यात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्वाभाविकच आरोग्य विभागासह इतर प्रशासनावरील ताणही वाढत आहे. हा वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावरून या गृहविलगीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.

महानगरातून व परजिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात नागरिक कारंजा तालुक्यात दाखल झाल्याने जुलै महिन्यापासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर सप्टेबर महिन्यात अनलाॅक चार सुरू झाल्याने व संचारबंदीत बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांच्या गर्दीत वाढ झाली. परिणामी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली.

आरोग्य विभागावरील हा ताण कमी व्हावा या उद्देशाने कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या परंतु सौम्य लक्षणे व फारसा त्रास न जाणवणाऱ्या तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वतःसाठी डाॅक्टरांची सेवा उपलब्ध करणाऱ्या रूग्णांना जिल्हा प्रशासनाने गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

कारंजा तालुक्यात आतापर्यंत ७६ रूग्णांनी हा पर्याय स्वीकारला असून, तालुक्यात बाधित रूग्णापेक्षा बरे होणाऱ्या रूग्णाचे प्रमाण अधिक असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येत आहे. या पर्यायामुळे आरोग्ययंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Dont go to Covid center, just go home, 76 patients prefer home segregation