उभ्या कपाशीवर फिवरला ट्रॅक्टर

विरेंद्रसिंह राजपूत
Tuesday, 10 November 2020

कॉटनबेल्टसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे एकरी चार पाच क्विंटलच्या वर उत्पन्न मिळाले नसल्याने पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : कॉटनबेल्टसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे एकरी चार पाच क्विंटलच्या वर उत्पन्न मिळाले नसल्याने पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.

दरवर्षी येणाऱ्या बोंड अळीमुळे खोडा कपाशीचे उत्पन्नही बेभरवशाचे झाल्याने शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरवून रब्बीच्या गहू, हरभरा व मका पिकाला सध्या पसंती दिली असून, आतापर्यंत मिळालेल्या उत्पन्नातूनच रब्बीची पेरणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली असतानाच कापसाच्या भावातील मंदी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, मोताळा, मलकापूर, खामगाव,जळगाव जामोद,संग्रामपूर, शेगाव व घाटावरील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कपाशी असून यावर्षी जास्त पावसामुळे हे पीक पाहिजे त्या प्रमाणात नसतांनाच ऐन फुल, पाती व बोंड येण्याच्या काळात पाऊस सुरू राहिल्याने या पिकाचे अतोनात नुकसान झाले व जो काही कापूस येणार तोच परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांना अतिशय नगण्य उत्पादन मिळाले व वेचाई १० रुपये प्रती किलो पार झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

अशातच सद्या भावही ५ हजार रुपये क्विंटलवर स्थिर असून लागलेला खर्चही निघत नसतांनाच रब्बी हंगाम जवळ आल्याने आहे त्या भावात शेतकरी कापूस विकून रब्बीची पेरणी करीत आहे.विशेष म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांपासून खोडा कपाशीवर बोन्डअळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण होत असल्याने परत कपाशीला पाणी द्यायचे, नको रे बाबा...म्हणत उभ्या कपाशीवर ट्रॅक्टर फिरविला जात आहे.

सद्या कपाशी उपटून गहू,हरभरा व मका पीक घेण्याकडे कल असून खरीपाचे संपूर्ण उत्पन्न यासाठी खर्ची करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आजरोजी आली आहे. हीच संधी साधून व्यापारीवर्ग पड्या भावात कापसाची खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यावर्षी कपाशीचे उत्पन्न कमी अधिक प्रमाणात आले असले तरी वेचाई खर्च कधी नव्हे एवढा शेतकऱ्यांना करावा लागला आहे.सोबतच इतर खर्च पकडता उत्पादन खर्च वाढला असतांनाही पाहिजे असे कापसाला भाव नसल्याने सर्व शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीला आर्थिक चणचण भासत आहे.
- किसना पाटील, शेतकरी, शेंबा.

गेल्या दोन वर्षांपासून विहिरींना पाणी असल्याने पिकबदल म्हणून रब्बीची पेरणी करीत आहोत.वास्तविक खरिपाचे पूर्ण उत्पन्न यासाठी खर्च होत असून, अस्मानी व सुलतानी संकटात हे पीक घरात येईल की नाही याचा भरवसा नसतांनाही छातीवर दगड ठेवून आम्ही अशी रिस्क नेहमीच घेत असतो.
- बाळू जाधव, शेतकरी, डोलखेड

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A farmer turned a tractor on a cotton crop out of fear of larvae