शेवटी शेतकऱ्यांची दिवाळी जाणार अंधारातच!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

मागील महिन्यात ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीमोल झाले. शासनस्तरावर मदतीची घोषणा झाली तरी, ही घोषणा आता हवेत विरली असून मदतीच्या आशेवर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

वाशीम  ः मागील महिन्यात ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीमोल झाले. शासनस्तरावर मदतीची घोषणा झाली तरी, ही घोषणा आता हवेत विरली असून मदतीच्या आशेवर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

यावर्षी सततच्या पावसाने व धुक्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल असा आला आहे. हे दोन क्विंटल सोयाबीनही अस्मानी संकटाने हिरावून घेतले आहे.

मागील महिन्यात झालेल्या प्रचंड पाऊस व धुक्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच भिजले. हाती तोंडी आलेला घास पावसाने मातीमोल झाला. पाऊस झाल्यानंतर शासन स्तरावर शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र वाशीम जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून कोणतेही पंचनामे करण्यात आले नाही. सरसकट नुकसानीचे आकडे शासनाकडे पाठविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे किमान दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल ही आशा असताना आता शासनस्तरावर कोणतीही हालचाल नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

आधीच दोन पोते त्यात दर मातीमोल
पावसाने सोयाबीन भिजल्याने त्याची प्रत खराब झाली आहे. बाजारात हे काळे झालेले सोयाबीन एक हजार ५०० रूपये दरानेही कोणी घ्यायला तयार नाही. या परिस्थितीत शासनाने मदत करणे अपेक्षित असताना मदत मिळाली नाही. त्यामुळे आता दिवाळी साजरी करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रब्बीचा झाला खोडा
एकीकडे दिवाळी अंधारात जात असताना शिवारातही स्मशानशांतता आहे. पैशाअभावी रब्बीच्या खते व बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. खरिपाचे घेतलेले कर्ज अजून थकीत आहे. रब्बीच्या पिककर्जाची कोणतीही सोय नाही. खरिपाचे पिककर्ज थकीत असले तरी रब्बीसाठी पुन्हा पिककर्ज मिळाले तरच रब्बीच्या पेरणीची सोय होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmers Diwali will finally go in the dark!