esakal | शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर: काही कारण्याअगोदरच, आगीत पाच सोयाबीन गंजीची राखरांगोळी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Five farmers soybean stubble fire

शिरपूर जैन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोयाळी खुर्द येथे पाच शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीस अज्ञात इसमाने आग लावली. आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले. या आगीत पाच शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीची राखरांगोळी झाल्याने एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर: काही कारण्याअगोदरच, आगीत पाच सोयाबीन गंजीची राखरांगोळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः शिरपूर जैन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोयाळी खुर्द येथे पाच शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीस अज्ञात इसमाने आग लावली. आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले. या आगीत पाच शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीची राखरांगोळी झाल्याने एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही आगीची घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिरपूरचे ठाणेदार समाधान वाठोरे व दामोदर इप्पर यांनी उपरोक्त घटनास्थळ गाठले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ता. २७ ऑक्टोबरला रात्री शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोयाळी खुर्द येथील रहिवासी किशोर यशवंता पोघे (वय ५०) यांच्या शेतातील सोयाबीन गंजी जळून भस्मसात झाली. त्यामुळे २ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. मागे अडीच हजार रुपयाची ताडपत्री, गोठ्या वरील ८ टिनपत्रे आठ हजार रुपयाचे, १० एचपीचे इंजिन किंमत अंदाजे १५ हजार रुपये, फवारणीचा पेट्रोल पंप ४ हजार रुपये, ७ हजार रुपयाचा केबल व शेतातील ५ हजार रुपयाची इतर साधनसामुग्री जळून भस्मसात झाली.

गजानन प्रल्हाद बोरकर यांच्या शेतातील २५ पोते सोयाबीन किंमत १ लाख रुपये, चार हजार रुपयाची ताडपत्री जळून भस्मसात झाली. गणेश एकनाथ बोरकर यांची शेतातील ३० पोते सोयाबीन १ लाख २० हजार रुपये व तीन हजार रुपयाची ताडपत्री जळून भस्मसात होऊन नुकसान झाले.

भानुदास नामदेव भूकतर यांच्या शेतातील १८ पोते सोयाबीन ७२ हजार रुपयांची, दोन हजार रुपयाची ताडपत्री जळून खाक झाली. वसंता विठोबा अंभोरे यांच्या चार एकर शेतातील २५ पोते सोयाबीन किंमत १ लाख रुपये, दोन हजार रुपयाची ताडपत्री जळून भस्मसात झाली,

असे एकूण या आगीमुळे पाच शेतकऱ्यांचे एकूण ७ लाख २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उपरोक्त शेतकरी हतबल झाले आहेत. या आगीच्या घटनेने इतर शेतकरीही भयभीत झाले आहेत.

शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार समाधान वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद साठे हे करीत आहेत. यापूर्वी देखील नावली व मांगुळ झनक येथे सोयाबीनच्या गंजीला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.


पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
जिल्ह्यामध्ये सोयाबीन गंजींना आग लावण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांची फिर्याद दिल्यानंतर कोणतीच कारवाई होत नाही. इतर गुन्ह्यासारखा हा गुन्हा नसून वर्षभराची मेहनत खाक करण्याची ही निच कृती आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. प्रसंगी श्वानपथकाची मदत घेतली तर गुन्हेगारापर्यंत सहज पोचता येईल. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याबाबत सर्वच पोलिस ठाण्यात असे आदेश देण्याची गरज आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image