esakal | अंडी व चिकन व्यवसायाला ‘अच्छे दिन’, शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय फुलू लागला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Good days for egg and chicken business, farmers joint business started flourishing

 कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेले गैरसमज आणि पसलेल्या अफवामुळे कुकुट पालन व्यवसाय कोलमडला असताना अनेक व्यवसायिक कर्जबाजारी झाले तर अनेकांना मागणी अभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या.

अंडी व चिकन व्यवसायाला ‘अच्छे दिन’, शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय फुलू लागला

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) :  कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेले गैरसमज आणि पसलेल्या अफवामुळे कुकुट पालन व्यवसाय कोलमडला असताना अनेक व्यवसायिक कर्जबाजारी झाले तर अनेकांना मागणी अभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या.

मात्र आता प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अंडी, चिकन खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून मिळत असल्याने कुकूटपालन व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. अंड्याचे दर प्रति नंग ७ पर्यंत तर चिकनचे दर प्रति किलो २०० रुपयांपर्यंत गेल्याने या व्यवसायाला अच्छे दिन आले आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या जोडधंद्याला त्यामुळे सध्या उभारी मिळत आहे.

सध्या कोरोना आपत्ती काळात अनेक जण आहाराच्या बाबतीत जागृत झाले असल्याने पोष्टीक आहारवर भर दिला जात असून, अंडी व चिकनमध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे त्याला पसंती दिली जात आहे. कोरोना रुग्णांना देखील दररोज आहारात अंडी दिली जात असल्यामुळे मागणी वाढून दरात तेजी आली आहे. कोरोना बाधित रुग्णांना आहारात दूध अंडी यांचा समावेश असून, तसेही अंडी व चिकन खाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे मागणी वाढली व दरात वाढ झाली आहे.

ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांनी अंडी, चिकन खावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. सोबतच कोविड उपचार केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात असल्यामुळे अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पोल्ट्रीधारकांकडून पाच ते सव्वा पाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे.

तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले असून, चिकनचे दर प्रति किलो २०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होत आहे. उत्पादनात घट असल्याने ग्राहकांना मात्र यासाठी आणखी काही काळ ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)