मोबाईलमधील फोटोच्या कारणावरून चाकू मारून जखमी केले

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 8 December 2020

 मोबाईलमधील फोटोच्या कारणावरून परमेश्‍वर अर्जुन हुंबाड (वय ३४) याला चाकू मारून जखमी केल्याची घटना (ता.४) रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान महागाव येथे घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रिसोड (जि.वाशीम) :  मोबाईलमधील फोटोच्या कारणावरून परमेश्‍वर अर्जुन हुंबाड (वय ३४) याला चाकू मारून जखमी केल्याची घटना (ता.४) रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान महागाव येथे घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महागाव येथील परमेश्वर अर्जुन हुंबाड (वय ३४) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बाळखेड येथील ज्ञानेश्वर सोनुने हा मोबाईलमध्ये असलेल्या फोटोबद्दल नेहमी बोलून त्यास त्रास द्यायचा.

परमेश्‍वर (ता.४) डिसेंबरच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान लघूशंका करण्यास उठून घराच्या बाहेर आले असता तेथे ज्ञानेश्वर सुद्धा आला. तू येथे का आलास म्हणून परमेश्वरने ज्ञानेश्वरला हटकले असता, ज्ञानेश्‍वरने त्याच्या मोबाईल मधील फोटो दाखवतो असे सांगून, घराच्या थोड्या अंतरावर नेले व तेथे त्यास चाकूने वार करून जखमी केले.

पुन्हा तुला दाखवून देतो व जीवाने मारून टाकतो अशी धमकी देत तेथून पळ काढला. गावातील नागरिकांनी परमेश्वराला गावातील एका खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला मेहकरला नेण्यात आले.

उपचारानंतर परमेश्वरने रविवारी (ता.६) रिसोड पोलिसात तक्रार दिली असता, पोलिसांनी ज्ञानेश्‍वर विरुद्ध भादविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: He was stabbed and injured due to a photo in his mobile