कोरोनाचे संकट अन् पावसाच्या व्यत्ययावर गणेशभक्तांचा उत्साह भारी

सुगत खाडे  
Saturday, 22 August 2020

सध्या कोरोनाचं थैमान सुरू असल्याने सगळ्याच कामांवर निर्बंध आले आहेत, परंतु गणेशोत्सव हा सर्व उत्सवाचा राजा असल्याने अकोलेकरांचा उत्साह कोरोना थांबवू शकला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून घरात बसलेल्या अकोलेकरांनी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी शनिवारी (ता. २२) बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले.

अकोला  : सध्या कोरोनाचं थैमान सुरू असल्याने सगळ्याच कामांवर निर्बंध आले आहेत, परंतु गणेशोत्सव हा सर्व उत्सवाचा राजा असल्याने अकोलेकरांचा उत्साह कोरोना थांबवू शकला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून घरात बसलेल्या अकोलेकरांनी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी शनिवारी (ता. २२) बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले.

साधेपणाने का होईना नागरिकांनी थाटात बाप्पाला आपल्या घरात आणलं. यावर्षी लोकांचा शाडूच्या मूर्ती घेण्याकडे जास्त कल पाहायला मिळाला. पावसाची रिपरिप असल्यानंतर सुद्धा घराघरात उत्साहाच्या वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सर्वांच्या दु:खांचे निराकरण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला यंदा करोनाचे विघ्न आले आहे. अत्यंत साधेपणाने हा उत्सव यंदा साजरा केला जाणार असल्याने भक्‍तांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

महाराष्ट्रातील एकमेव खामगावचा लाकडी गणपती

मात्र, अनेक मंडळाचे कार्यकर्ते यावर्षी पारंपरिक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर देणार आहेत. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दहा दिवसांच्या कालावधीत घरोघरी आनंदाचे वातावरण असते.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळते. लहान मुलांपासून ते अबाल वृद्धापर्यंत सर्वांनाच या लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहतात. बाप्पांच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आगोदर जय्यत तयारी सुरू असते. चालू वर्षी मात्र, या उत्सवाला कोरोनाची दृष्ट लागली आहे.

वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती बाराभाई गणपती 

गेली चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना या महाभयंकर संसर्गाला लढा देत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता साधेपणाने गणेशोत्वस साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाला कोरोना संक्रमणाचे सावट असून मोठ्‍या प्रमाणात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या कृपेने कोरोनाचे संकट कायमचे जावो, अशी प्रार्थना सर्व गणेशभक्त यावर्षी करणार आहेत.

लोकमान्यांच्या स्फुर्तीने नावाजला राष्ट्रीय गणेशत्सोव 

बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी
कोरोनाच्या संकटातही शनिवारी (ता. २२) रिमझिम पावसात बाप्पांच्या आगमनासाठी, सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. जणू शहरात करोनाचा संसर्ग नाहीच याच आविर्भावात नागरिकांनी दिलखुलास खरेदीला झुकते माप दिले. भाज्या, फळे, फुलांपासून, पूजेचे साहित्य, मिठाई, कपड्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
 
ढोल-ताशांना फाटा
गणरायाची स्थापना करण्यासाठी यावर्षी नागरिकांनी प्रथमच विघ्नहर्त्याच्या लहान मूर्त्यांची खरेदी केली. त्यासोबतच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला घरोघरी घेवून जाण्यायेवजी नागरिकांनी साधेपणाने घरी नेले व उत्साहात बाप्पांची स्थापना केली. दरवर्षी उत्सव सुरू होताच घरोघरी सामूदायिकरित्या होणारे भजन, पूजन, आरती आदी कार्यक्रमांनी परिसर गजबजून जातो. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात करण्यास बंदी असल्याने भाविकांच्या उत्साहावर काहीसे नियंत्रण आल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Ladakya Ganpati Bappas arrival