वागीर पाणबुडीच्या निर्माण कार्यात मेहकरच्या सुपुत्राचे योगदान

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

देशाच्या संरक्षण व्यवस्थेत भरीव वाढ करणार्‍या आयएनएस वागिर या पाणबुडीच्या निर्माण कार्यात मेहकरच्या सुपुत्राची भरीव कामगिरी राहिली आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

मेहकर (जि. बुलडाणा)  : देशाच्या संरक्षण व्यवस्थेत भरीव वाढ करणार्‍या आयएनएस वागिर या पाणबुडीच्या निर्माण कार्यात मेहकरच्या सुपुत्राची भरीव कामगिरी राहिली आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

आयइनएस वागीर या पाणबुडीचा जलावतरण सोहळा मुंबई येथे १२ नोव्हेंबरला पार पडला. या पाणबुडीच्या निर्माण कार्यामध्ये मेहकरच्या सुपुत्राचा सहभाग असल्याने शहरासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

संदीप जानुजी पठ्ठे हे त्या अभियंत्याचे नाव असून ते माझगाव डॉक लिमिटेड मुंबई येथे डेप्युटी मॅनेजर अर्थात उप व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. मूळचे मेहकर येथील रहिवासी असलेले संदीप यांचा जन्म सर्वसाधारण कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण शहरातील नगरपालिकेच्या शाळेत झाल्यानंतर,12 वी पर्यंतचे शिक्षण स्थानिक मे.ए.सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाले.

अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच संदीप यांनी तिसर्‍या वर्षाला असताना अखिल भारतीय स्तरावर होणारी गेट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. या गुणांच्या आधारे त्यांना आयआयटी मद्रास या भारतात सात पैकी एक असलेल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान(आयआयटी) मध्ये एम. टेक.या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.

दोन वर्षे या संस्थेतील अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे कॅम्पस सिलेक्शन होऊन एल अँड टी या कंपनीत निवड झाली. या ठिकाणी तीन वर्ष न्यूक्लिअर पाणबुडीवर काम केल्यानंतर दोन वर्षे त्यांनी कलकत्ता येथील गार्डनरीच शिपबिल्डर्स याठिकाणी युद्धनौका बनविण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांची निवड देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या माझगाव डॉक लिमिटेड मुंबई या ठिकाणी झाली.

मागील सहा वर्षापासून त्यांनी आयएनएस वागिर या समुद्रात पाण्याखाली ३५० मीटर लांब राहणाऱ्या शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या पाणबुडीच्या निर्माण कार्यात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Mehkars son contribution in the construction of Wagir submarine