धक्कादाय : २२ हजार नागरिक ‘को-मॉर्बिड’ग्रस्त! माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती उघड

सुगत खाडे  
Tuesday, 6 October 2020

जिल्ह्यातील २१ हजार ६८१ नागरिकांना कोरोनासह इतर जिवघेणे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. अशा को-मॉर्बिड (इतर आजारांनी ग्रस्त) नागरिकांची माहिती माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेतून समोर आली आहे.

अकोला  ः जिल्ह्यातील २१ हजार ६८१ नागरिकांना कोरोनासह इतर जिवघेणे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. अशा को-मॉर्बिड (इतर आजारांनी ग्रस्त) नागरिकांची माहिती माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेतून समोर आली आहे.

सर्व्हेक्षणादरम्यान सदर श्रेणीतील नागरिकांना उच्च व कमी रक्तदाब, मधुमेह, किडणीचे आजार, दमा व इतर दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच रोगांनी ग्रस्त नागरिकांचे आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात सर्वाधित बळी गेल्याने मोहिमेत आढळलेल्या या दुर्धर आजारग्रस्तांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाला करावे लागतील.

अनलॉक सुरू असताना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयीत कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्‍ठपणा यासारख्या महत्त्वाच्या को-मॉर्बिड कंडिशन असणाऱ्या व्यक्ती शोधून घेणे, असे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

त्यासाठी शासनामार्फत १५ सप्टेंबरपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जावून त्यांचे आरोग्य तपासण्यात येत आहे. सदर तपासणीत ग्रामीण भागातील २१ हजार ६८१ नागरिक को-मॉर्बिडग्रस्त असल्याचे आढळून आले.

नऊ लाख लोकसंख्येचे सर्व्हेक्षण
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबरपासून शुक्रवार (ता. २) पर्यंत ग्रामीण भागातील ९ लाख १ हजार ७९२ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यासह २ लाख ९ हजार ३४९ घरांचे सुद्धा सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील १० लाख १० हजार ८०३ लोकसंख्येच्या प्रमाणात सदर सर्व्हेक्षण करण्यात आल्याने अभियानाचा पहिला टप्पा जवळपास पूर्णच झाल्याचे दिसून येत आहे. सर्व्हेक्षणासाठी एकूण १ हजार २२५ पथक गठित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आशा स्वयंसेविका, स्थानिक प्रतिनिधींनी सुचवल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे.

मोहिमेतून समोर आलेली माहिती
- एकूण लोकसंख्या (ग्रामीण) - १० लाख १० हजार ८०३
- एकूण घरे - २ लाख १७ हजार ८१०
- एकूण सर्व्हेक्षण केलेली लोकसंख्या - ९ लाख १ हजार ७९२
- एकूण सर्व्हेक्षण केलेली घरे - २ लाख ९ हजार ३४९
- कोविड संशयीत आढळलेले रुग्ण - ७६०
- को-मॉर्बिड रुग्ण - २१ हजार ६८१ (इतर आजार)
- फिव्हर क्लिनीकला संदर्भीत केलेले रुग्ण - २१४
- स्वॅब घेतलेले व्यक्ती - २०३

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: My family-my responsibility, 22,000 citizens suffer from co-morbid!