नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिगूल वाजला, कार्यकर्ते लागले कामाला

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 10 November 2020

मालेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यापासून सर्वच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

मालेगाव (जि.वाशीम) ः मालेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यापासून सर्वच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

येत्या तीन महिन्यात नगरपंचायतची ही दुसरी निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे असे बोलले जात आहे. ‌यावेळी तरूण तसेच नवख्या संभाव्य उमेदवारांची संख्या खूप मोठी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रस्थापितांना फार मोठी ताकद लावावी लागणार आहे व त्यांचा कसं लागणार आहे.

प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांनी भेटीगाठी वाढवने सुरू केले आहे. संध्याकाळी चौकाचौकात शेकोटीवर राजकीय चर्चा रंगत आहेत. कोण, कोणत्या प्रभागांमध्ये योग्य राहील आणि कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या नगरसेवकांनी काय काम केले आणि काय केले नाही, याचा लेखाजोखा मांडणे सुरू झाले आहे.

मतदार सुद्धा याची यादी तयार करून ठेवत आहेत. कार्यकर्त्यांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. यावेळी उमेदवारी भाऊगर्दी वाढणार आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील मोठी राजकीय मंडळी आपापल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन सतर्क राहण्याचे आदेश देत आहेत.

३० डिसेंबर रोजी प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खरं राजकीय वातावरण तापणार आहे. सध्या आतून राजकीय हालचाली खूप वाढल्या आहेत. विद्यमान नगरसेवक सुद्धा आपापल्या प्रभागामध्ये फिरून भेटीगाठी घेत आहेत. केलेल्या कामाची माहिती देत आहेत.

यावेळी माझी इच्छा नाही परंतु, आपण सर्वांनी फोर्स केल्यास मी सुद्धा उभे राहण्याचा विचार करेल, असे बोलून एक प्रकारे उभे राहण्याचा संदेशच देत आहेत. यावेळची निवडणूक फारच चुरशीची आणि अटितटीची आणि प्रतिष्ठेची होईल तसेच पैसा सुद्धा पाण्यासारखा खर्च होण्याची शक्यता बोलली जात आहे.

आरक्षण सोडतीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदार राजा आता खूपच हुशार झाला असल्यामुळे तो कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही. त्याला आपला उमेदवार योग्य कोण आणि अयोग्य कोण याची जाण असल्यामुळे उमेदवाराचा चांगलाच कस लागणार आहे. राजकीय हालचाली आतून खूप वाढल्या आहेत. वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

निडणूक होणार चुरशीची
ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा प्रवास होण्यास केवळ पाच वर्षाचा कालावधी झाला आहे. नवीन नगरपंचायतीची ही दुसरी निवडणुक आहे. गतवेळीपेक्षा यावेळी नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. विधानसभा निवडणूकीनंतर शहरातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. अनेकांनी जुन्या पक्षाशी फारकत घेतली आहे तर, नाराजांचे तांडे प्रत्येक पक्षात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Nagar Panchayat elections, activists started work