esakal | महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जेथे केली जाते रावणाची पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The only temple of Ravana in Maharashtra where worship of Ravana

अवघ्या भारतवर्षात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू असल्याने राक्षस म्हणून रावणाची हेटाळणी होणे यात काही आश्चर्य नाही, परंतु पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव याला अपवाद आहे. रावणाच्या सद्‍गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल दोनशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जेथे केली जाते रावणाची पूजा

sakal_logo
By
श्रीकृष्ण शेगोकार

पातूर (जि.अकोला): अवघ्या भारतवर्षात मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू असल्याने राक्षस म्हणून रावणाची हेटाळणी होणे यात काही आश्चर्य नाही, परंतु पातूर तालुक्यातील सांगोळा हे गाव याला अपवाद आहे. रावणाच्या सद्‍गुणांमुळे येथे रावणाची पूजा केली जाते. तब्बल दोनशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

‘वाईट ते सोडावे, चांगले ते घ्यावे’ ही शिकवण आपल्याला सांस्कृतीने दिली आहे. दशानन रावणामध्ये अनेक चांगले गुण होते. या सद्‍गुणांमुळे रावणाची सांगोळ्यात पूजा केली जाते. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे.

हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान आहे. रावणातील दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील चांगल्या गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धिमान, महापराक्रमी, वेदाभ्यासी, एकवचनी या गुणांमुळे सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. येथील रावणाचे मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलले जाते.

महापंडित रावणाची नगरी लंका अकोल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची नित्यनेमाने पूजा केली जाते. गेल्या दोनशे वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत.

ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले, पण त्याच्या हातून घडली ही दशानन रावणाची मूर्ती! दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली.

मूर्ती घडवली तिथे असलेले दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड आणि अवचित घडलेली ही घटना ‘लंकेश्वराची मूर्ती’ हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. तेंव्हापासून आजपर्यंत येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गावात रावणाचे भव्य मंदिर व्हावे असा ग्रामस्थांचा मानस आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top