गूढ वाढवले, अमरावतीत अडकला ‘गुणवत्ता’ अहवाल

सुगत खाडे  
Wednesday, 14 October 2020

जिल्ह्यातील कीटकनाशक विक्री केंद्रांमधून घेतलेल्या ५७ कीटकनाशक नमून्यांच्या परीक्षणाचा गुणवत्ता अहवाल अमरावती येथील कीटकनाशक विश्लेषण (चाचणी) प्रयोगशाळेत अडकला आहे.

अकोला  ः जिल्ह्यातील कीटकनाशक विक्री केंद्रांमधून घेतलेल्या ५७ कीटकनाशक नमून्यांच्या परीक्षणाचा गुणवत्ता अहवाल अमरावती येथील कीटकनाशक विश्लेषण (चाचणी) प्रयोगशाळेत अडकला आहे.

त्यामुळे कीटकनाशकांमध्ये भेसळ व मुळ घटकांचे प्रमाण अधिक वापरून शेतकऱ्यांच्या मस्तकी जहाल कीटकनाशके मारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला अडचणी येत आहेत.

सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती. त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते.

अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते.

सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. यावर्षी बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) यांचा फवारणीतून विषबाधा झाल्याने बळी गेला.

याव्यतिरीक्त अकोला जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संबंधितांवर सर्वोपचार रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे असले तरी आता पिकांच्या मशागतीसह फवारणीचे प्रकार वाढत असल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

असे घेतले कीटकनाशकांचे नमुने
जिल्ह्यातील अकोला तालुक्यातून ७, अकोट येथून ६, बाळापूर ४, मूर्तिजापूर ७, बार्शीटाकळी ४, पातूर ७ व तेल्हारा तालुक्यातून ६ कीटकनाशकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यासह मोहिम अधिकारी यांनी १४ व जिल्हा कृषी अधिकारी यांनी २ कीटकनाशकांचे नमुने घेतले आहेत. असे एकूण ५७ नमुने तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. परंतु अद्याप नमुन्यांचा गुणवत्ता अहवाल प्राप्त न झाल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे.

आतापर्यंत १४० जणांना विषबाधा
पिकांच्या मशागतीला वेग आलेला असतानाच कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. फवारणीमुळे आतापर्यंत १४० शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. याव्यतिरीक्त एकाचा बळी सुद्धा गेला आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टी व नापिकीने हताश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता विषबाधेचा धोका अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे.

कीटकनाशकांच्या गुणवत्तेसाठी कीटकनाशके कायदा अस्तित्वात आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणी करिता कीटकनाशकांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करण्यात येते. त्याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५७ कीटकनाशकांचे नमूने काढण्यात आले आहेत. त्याचा गुणवत्ता अहवाल प्रलंबित आहे.
- मुरलीधर इंगळे
कृषी विकास अधिकारी,
जिल्हा परिषद (कृषी विभाग), अकोला

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Pending pesticide reports add to mystery