
तालुक्यातील ३० ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ता. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खेड्या-पाड्यात तर गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. शोकोटीवर राजकीय चर्चा रंगत आहेत. इच्छुक उमेदवारांकडून मोबाईलवरच संपर्क साधला जात आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे.
मालेगाव (जि.वाशीम) ः तालुक्यातील ३० ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ता. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खेड्या-पाड्यात तर गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. शोकोटीवर राजकीय चर्चा रंगत आहेत. इच्छुक उमेदवारांकडून मोबाईलवरच संपर्क साधला जात आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील मेडशी, राजाकिन्ही, शिरपूर, जोडगव्हाण, करंजी, जऊळका, पांगरी कुटे, वसारी याठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. संभाव्य उमेदवार व राजकीय नेते एकमेकांशी सतत मोबाइलवर संपर्क साधून सूचना देत आहेत. या निवडणुकीत मोबाईल फोन हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सध्या मोबाईलवर संपर्क साधून चर्चा केली जात आहे. सर्वच गावात उमेदवाराची भाऊगर्दी होणार आहे.
कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. युवावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला दिसत आहे. प्रस्थापितांना हादरा देण्यासाठी युवाची फळी तयार होत आहे. मागच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. तालुक्यातील जोडगव्हाण शिरपूर, मेडशी या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायतीकडे सर्वाचेच लक्ष लागले असून, ग्रामपंचायत ताब्यात कशी राहील यासाठी योजना आखली जात आहे.
ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीसाठी अनेक राजकीय कार्यकर्ते उत्सूक असले तरी, वरिष्ठ पातळीवरून हाय कमांडच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे. पुढाकार कोण घेतो याकडे सुद्धा तालुका पुढाऱ्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीसाठी राजकीय वातावरण अनुकूल दिसत आहे. परंतु, सध्या आघाडीच्या एकीवर बोलले जात नसल्यामुळे संभाव्य उमेदवार आपापल्या परीने मतदारांच्या भेटी घेऊन तयारीला लागले आहेत.
खेड्यापाड्यातील राजकीय पदाधिकारी तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर येऊन वरिष्ठांची चर्चा करीत आहेत. यावेळी मात्र सर्वांसाठी ही निवडणूक कठीण होणार आहे. ग्रामपंचायत प्रमाणेच मालेगाव नगरपंचायतची निवडणूक फारच प्रतिष्ठेची आणि अतीतटीची होणार आहे. नगराध्यक्षाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी आहे हे स्पष्ट झाले नसले तरी, संभाव्य उमेदवार व कार्यकर्ते राजकीय पुढारी कामाला लागले आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)