esakal | तुमच्या ताटातील डाळ होऊ शकते गायब!, तूर डाळीचे भाव वाढतायेत, व्यापाऱ्यांना मोठा फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Pulses in your plate may disappear! Prices of pulses are on the rise, great benefit to traders

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळींच्या पिकांचे मोठे नकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी नंतर नव्या वर्षांत येणाऱ्या तुरडाळीचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. वरण हा तसा भारतीय चौरस आहारातील महत्वाचा घटक.

तुमच्या ताटातील डाळ होऊ शकते गायब!, तूर डाळीचे भाव वाढतायेत, व्यापाऱ्यांना मोठा फायदा

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळींच्या पिकांचे मोठे नकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी नंतर नव्या वर्षांत येणाऱ्या तुरडाळीचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. वरण हा तसा भारतीय चौरस आहारातील महत्वाचा घटक.

हेच वरण बनवण्यासाठी लागणाऱ्या तूरडाळीचे भाव वाढले आहेत. सुमारे २० टक्के इतकी वाढ झाल्याने आता तुरीचे भाव डाळ मिलमध्येच १०० रुपये किलोला पोहोचले आहेत.

भारतात तुरीचे बम्पर उत्पादन होऊन सरकारने त्यावेळी तुरीला योग्य हमीभाव देण्याची तसदी घेतली नव्हती. परिणामी मग वाईट अनुभवामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे क्षेत्र कमी करून इतर पिकांसाठी ते वापरण्याचा ट्रेंड ठेवला होता.

मागील वर्षीही तेच चित्र होते. परिणामी आता देशांतर्गत बाजारात मागणी जास्त आणि तुलनेते पुरवठा कमी होण्याच्या भीतीने तूरडाळीचे भाव वाढले आहेत.

आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच करोनाच्या काळात लोकांकडे पैसे कमी असतानाच महागाईचा आगडोंब उसळणार आहे.

आताच्या दरवाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण, चालू हंगामातील तुरीचे पिक बाजारात येण्यासाठी आणखी किमान अडीच महिने लागतील. अशावेळी व्यापाऱ्यांना याचा मोठा लाभ होईल. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील डाळ व्यापाऱ्यांना त्यामुळे मोठा फायदा होईल असे दिसते.

लॉकडाऊन काळात होलसेल मार्केटला तुरडाळ ९० रुपये किलो इतकी वाढली होती. नंतर मात्र, याचे भाव ८२ रुपये झाले. आता मात्र, भावाने १०० चाही टप्पा पार करण्याची तयारी केली आहे. जागतिक बाजारात तूर पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्याचवेळी मागणी वाढणार असल्याने तूरडाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. जागतिक मार्केटमध्ये तूर अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नसल्याने पुढील काळात भाववाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, नाफेडने जर बाजारात तूर आणण्यास सुरुवात केली तर मग भाव जास्त वाढणार नाहीत असे दिसते. 

तूरडाळ हे दैनंदिन धान्यातील महत्त्वाचे कडधान्य आहे. प्रत्येक घरात जेवणात वरण प्रामुख्याने असतेच. सध्या डाळ बाजारात समाधानकारक उलाढाल आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही डाळीचे दर अपेक्षेप्रमाणे मिळाताहेत.

डाळींचे दर हमीभावाच्या जवळपास असल्याने शेतकरी आणि व्यापारी सुखावलेले आहेत. सणासुदीच्या काळात सर्व प्रकारच्या डाळींची मागणी जोरात आहे. मात्र नुकतेच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आलेले पीक गेले. राज्यात जवळपास चाळीस टक्के डाळ पिकांचे नुकसान झाले.