esakal | शेतकऱ्यांना ४७ कोटी ८९ लाखांची मदत !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rs 47.89 crore assistance to farmers!

खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ८९ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

शेतकऱ्यांना ४७ कोटी ८९ लाखांची मदत !

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा  : खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ८९ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

यामध्ये मनुष्य हनी जखमी तसेच नैसर्गिक आपत्ती मध्ये पूर्णतः नुकसान ग्रस्त झालेल्या घरांचा घरगुती भांडी व वस्तूंसाठी च्या अर्थसहाय्य याचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३२ कोटी १७ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची रक्कम ही खरिपाच्या पिकांसाठी आहे.


राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक पावसामुळे नष्ट झाले, तर आलेल्या पिकांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोयाबीनचा दर्जा घसरला मुळे लाखो रुपयांचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यासंदर्भात विविध संघटना शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी देखील शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे अशा मागण्या लावून धरल्या होत्या. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने यासाठी तगादा लावला होता.

यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आदींचा मार्ग अवलंबण्यात आला होता. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने या शेतकर्‍यांना मदतीसाठी सोमवारी (ता. ९ )एक शासन निर्णय करून जिल्हानिहाय मदतीची रक्कम जाहीर केली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात महसूल यंत्रणेमार्फत पिकांचा सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते.

हे अहवाल गेल्या नंतर आता शासनाने मदतीची रक्कम जाहीर केली आहे. बाधित शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत ही मदत देण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी खर्च करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विचार केल्यास मनुष्यहानी जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांच्या झालेल्या नुकसानीपोटी पंधरा लाख ४५ हजार रुपये, वृत्त जनावरांसाठी नऊ लाख नऊ हजार रुपये तर पूर्णतः पडलेल्या कच्च्या पक्क्या घरे व झोपण्यासाठी गोठ्यासाठी ३४ लाख आठ हजार रुपये तसेच शेती पिकाच्या नुकसानीसाठी ३२ कोटी सतरा लाख १० हजार रुपयांचे मदत मंजूर केलेली आहे. पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी १५ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये मदतीचा समावेश आहे. ही मदत दिवाळीपूर्वी आपल्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

आचारसंहितेची अडचण येणार नाही
बुलडाणा जिल्ह्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र त्या विभागात मदतीचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत च्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. या अटींचे काटेकोर पालन करून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.


दुधाची तहान ताकावर
शासनाने अतिवृष्टी दलितांना मदत देण्याची भूमिका घेतली हा निर्णय चांगला आहे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर आता मदत हजारांमध्ये मिळेल त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया लोणार तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image