esakal | उशिरा सूचलेले शहानपण, नऊ महिन्यांनंतर उघडणार मंदिरांची द्वारं!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The temple will open after nine months!

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे गत मार्चपासून बंद असलेली मंदिरे अखेर पावड्यापासून भाविकांसाठी खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.

उशिरा सूचलेले शहानपण, नऊ महिन्यांनंतर उघडणार मंदिरांची द्वारं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उशिरा सूचलेले शहानपण, नऊ महिन्यांनंतर उघडणार मंदिरांची द्वारं!

अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे गत मार्चपासून बंद असलेली मंदिरे अखेर पावड्यापासून भाविकांसाठी खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.

त्यामुळे तब्बल नऊ महिन्यांनंतर अकोला शहर व जिल्ह्यातील मंदिरं भाविकांनी गजबजणार आहेत. सोमवारी सकाळी ६ वाजतापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिरांची द्वारं उघडी करण्याकरिता मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. कोविड नियमांचे पूर्ण पालन करूनच दर्शन घेता येणार आहे.

राज्यात मार्चमध्ये कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळ्यानंतर संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळला. मात्र त्यापूर्वीच जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन पाळण्यास सुरुवात करण्यात आली होती. दैनंदिन व्यवहारांसोबतच धार्मिक स्थळही बंद करण्यात आली होती.

कालांतराने कोविड विषाणूचा प्रभाव कमी होत गेला आणि रुग्ण संख्या घट गेल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मद्य विक्रीची दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने व बाजारही खुले करण्यात आले.

मात्र केंद्र शासनाच्या परवानगीनंतरही राज्यातील मंदिरांची दारे भाविकांसाठी बंदच होती. त्यासाठी भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने करून मंदिरे उघडण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूर येथे आंंदोलन करण्यात आले होते.

एवढेच नव्हे तर न्यायालयापर्यंतही मंदिरे उघडण्याचा प्रश्न पोहोचला होता. अखेर दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील भाविकांना राज्य सरकारने पाडव्यापासून दर्शनाची परवानगी दिली. त्यानुसार अकोला शहर जिल्ह्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून दर्शनासाठी खुली केली जात आहे.


नियमात राहूनच दर्शन
भाविकांना मंदिरात दर्शनाची परवागनी देण्यात आली असली तरी कोविड-१९ बाबत राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विना मास्क दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी नियमावही जाहीर करण्यात आली आहे.

उशिरा सूचलेले शहानपण
मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हे उशिरा सूचलेले शहानपण असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये पूजाअर्चा सुरूच होती. हिंदूंसह इतर धर्मियांची पार्थना स्थळेही सुरू होती. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याचा आग्रह भाजपने धरला होता.

‘वंचित’च्या आंदोलनाचा विजय!
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय हा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे व त्यातून आलेल्या दबावामुळे राज्य सरकारने घेतला आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आणि युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. मंदिरे उघडण्याचा निर्णय उशिरा जाहीर करताना सरकारने सर्व धर्मिय नागरिकांचा रोष ओढून घेतला असल्याचे ते म्हणाले.

(संपादन - विवेक मेतकर)