esakal | पालकमंत्र्यांच्या पालकत्वाचाच झाला जिल्ह्याला भार!, जिल्हा सोडला वाऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Washim district is angry with Guardian Minister Shambhuraje Desai

विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विविध जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. प्रशासकीय व्यवस्था गतीमान होवून सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा एकच उद्देश असतो.

पालकमंत्र्यांच्या पालकत्वाचाच झाला जिल्ह्याला भार!, जिल्हा सोडला वाऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम  ः विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विविध जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. प्रशासकीय व्यवस्था गतीमान होवून सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा एकच उद्देश असतो.

वाशीम जिल्ह्याला मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचे पालकत्वच भार झाला असून, पालकमंत्री यांनी जिल्ह्याकडे ढुंकूनही न पाहण्याचा चंग बांधला की काय, अशी शंका उत्पन्न होत आहे.

अवकाळीने शेतकरी गलितगात्र झाला असताना पालकमंत्री नेहमीप्रमाणे सातारच्या जिल्हा कचेरीतून जिल्ह्याचा आढावा घेत होते. हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.


वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले तर, काहींनी झेंडा टु झेंडा पालकत्व निभावले. माजी मंत्री सुभाष ठाकरे, विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, विद्यमान मंत्री संजय राठोड, बबनराव पाचपुते, विजकुमार गावित, डॉ.रणजित पाटील या पालकमंत्र्यांचा कार्यकाळ जिल्ह्याने अनुभवला. मंत्री अनिल देशमुख यांचा जनता दरबार व समस्या जाणून घेण्याची हातोटी अजूनही जिल्हावासयांच्या स्मरणात आहे.

सध्या महाआघाडी शासनाचे शंभूराज देसाई यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्याचे पालकत्व मिळाल्यानंतर सुरुवातीलाच शंभूराज देसाई या पालकत्वासाठी नाखुश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

आता हे पालकत्व कोणाला द्यायचे हा संवैधानिक अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असल्याने त्यात वाशीम जिल्ह्यातील नागरिकांचा दोष काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पालकत्वाचा भार दिल्यानंतर पालकमंत्री आधी स्वातंत्र्य दिन, नंतर प्रजासत्ताक दिन, एकदा कोरोनाचा धावता आढावा, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा व आता संत रामराव महाराज यांच्या अत्यंदर्शनाला धावती भेट, या व्यतिरिक्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे पाय जिल्ह्यात स्थिरावलेच नाहीत.

शेतकरी झाला गलितगात्र
मागील महिन्यात झालेल्या प्रचंड पाऊस व धुक्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल झाले. शासनाने फर्मान काढून पूर व अतिवृष्टीचा निकष लावून मदत मिळणारच नाही अशी तजविज केली. डोळ्यात अश्रू आणून शेतकरी मदतीची आस लावून बसला असताना पालकमंत्री साताऱ्यातच दौरे काढत होते. इकडे वर्षभर घाम गाळून पिकविलेले सोयाबीन पाण्यात वाहून जात असताना पालकमंत्री पाटण तालुक्यात दौरे करीत होते. त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई जर जिल्ह्यात आले असते तर, झालेले नुकसान व शासनाचा तुघलकी शासनादेश यामधून मार्ग काढता आला असता. पंचनामे झाले असते, मदत मिळाली असती तर, शेतकऱ्यांना अंधारात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली नसती.


मग पालकत्व हवेच कशाला?
जिल्ह्यातील विकासकामे, जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री महत्त्वाचा दुवा असतात. जर सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसून वाशीम जिल्ह्याच्या समस्या सोडवता येत असतील तर मग मुंबईत बसून खुद्द मुख्यमंत्रीही ते काम करू शकतात. मग पालकत्व हवेच कशाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(संपादन -  विवेक मेतकर)