esakal | मुद्दा गाजतोय: गरोदर मातांना दिला जातो निकृष्ट पोषण आहार
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Zilla Parishad Poor nutrition for pregnant mothers

  ग्रामीण भागातील गरोदर माता व बालकांना वाटप करण्यात येणारा पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत गाजला

मुद्दा गाजतोय: गरोदर मातांना दिला जातो निकृष्ट पोषण आहार

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला:  कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदाने फुलून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो.

आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु क्वचित कधी बाळाच्या जन्मानंतर किंवा गरोदर असतानाच तिच्या स्वप्नाचा चुरा होतो . जन्माला आलेले बाळ विकृत किंवा  आजारी असे जन्माला  येते . आणि आता एकविसाव्या शतकांत “एकच अपत्य आणि सुखी दांपत्य” अशी स्थिती  आहे. आता एकच  अपत्य म्हटले तर दाम्पत्याच्या सर्व आशा आकांक्षा  त्यावरच अवलंबून  असतात.

“एक अपत्य सुखी दांपत्य” या सूत्राच्या सर्व दांपत्यानी अवलंब केलातर वणव्याप्रमाणे फोफावलेल्या लोकसंख्येला आळा बसेल शिवाय एकच अपत्य असल्यामुळे त्यावर सर्व लक्ष केंद्रित करून त्याला सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांगपरीपूर्ण बनविता येईल.

यासाठी गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर म्हणजेच  सगर्भावस्थेत बालकाच्या जन्मापूर्वीपासून संस्कार करणे शक्य आहे. बाळाच्या निर्मितीसाठी माता-पिता हे कारणीभूत असतात.

त्यामुळे माता-पित्यांची शारीरिक अवस्था आरोग्यपूर्ण, सुसंस्कारित व शुद्ध असावी लागते. शरीरशुद्धी व मन:शुद्धी यासाठी आहार-विहाराचा विचार आवश्यक आहे. पथ्थ्यकर आहार-विहाराने  बीजनिर्मिती उत्तम होऊ शकते व आरोग्यपूर्ण  बीजसंयोगातून मातेच्या उदरात जन्माला येणारा अंकुर हा परिपूर्ण असतो.

असे असले तरी,. ग्रामीण भागातील गरोदर माता व बालकांना वाटप करण्यात येणारा पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत गाजला. यानंतर पोषण आहाराच्या संदर्भात तक्रार आल्यास पोषण आहाराचे नमुने जमा करून शासकीय प्रयोगशाळेत परिक्षणासाठी पाठवण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण समिती सभापती मनिषा बोर्डे यांनी सभेत दिले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीची ऑनलाईन सभा गुरुवारी (ता. २२) पार पडली. सभेत गरोदर मातांसह बालकांच्या आरोग्यासाठी पोषण आहार महत्वाचा असल्याचे सभापतींनी सांगितले. परंतु त्यानंतर सुद्धा अनेक गावात निष्कृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असल्याची खंत महिला व बालकल्याण समिती सभापती मनिषा बोर्डे यांनी व्यक्त केली.

पोषण आहाराचे वाटप करताना संबंधित जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्यांना माहिती देण्यात यावी, असे निर्देश सभापतींनी सभेच्या सचिवांना दिले. पोषण आहाराबाबत तक्रार असल्यास पुरवठ्याचे सॅम्पल जमा करून शासकीय प्रयोगशाळेला पाठवून त्वरित अहवाल प्राप्त करून घ्यावा. तसेच वाटपामध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित पुरवठादारा विरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सुद्धा सभापतींनी यावेळी दिले.

ऑनलाईन सभेला समिती सचिव तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी मबाक विलास मरसाळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या गायत्री कांबे, योगिता रोकडे, रिजवाना परवीन शे. मुक्तार,मीनाक्षी उन्हाळे, लता नितोने, वंदना झळके, उर्मिला डाबेराव, अनुसया राऊत व इतर उपस्थित होते.


सभापतींच्या पाहणीत आढळला निष्कृष्ट आहार
टी.एच.आर. अंतर्गत प्राप्त होणाऱ्या पोषण आहारासंदर्भात अकोट तालुक्यातील प्राप्त तक्रारींवर महिला बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्यासह अकोट पंचायत समिती सभापती लता नितोने यांनी धामणगाव चोरे, चंडिकापूर, सावरा अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्या होत्या. तेथे संबंधित पुरवठा यंत्रणेकडून निष्कृष्ट दर्जाचा काळा हरभरा पुरवठा करण्यात आला आणि मिरची व हळदचा पुरवठा झालाच नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे यानंतर असे प्रकार झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top