21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच, हिवरखेडचे सरपंचपद पुन्हा ठरणार औट घटकेचे?

Akola Political News Hivarkhed Fourteen Sarpanchs in 21 years, Gram Panchayat Election Municipal Council
Akola Political News Hivarkhed Fourteen Sarpanchs in 21 years, Gram Panchayat Election Municipal Council

हिवरखेड (जि.अकोला) : विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हिवरखेड येथे जेवढ्या काळात चार सरपंच व्हायला हवे होते तेवढ्या काळात तब्बल चौदा सरपंच, प्रभारी सरपंच आणि एक प्रशासक हिवरखेड वासियांना आतापर्यंत मिळाले आहेत.

तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत हिवरखेडचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. खुला प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्याने सर्व  सदस्य गण आनंदात असून त्यापैकी बहुतांश सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.  आता फक्त सरपंचपद महिलेसाठी राखीव राहते की खुले राहते हे  तीन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील सोडतीनंतर कळणार आहे.

येत्या आठवड्यात नवीन सरपंच विराजमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरपंचपदी कोण विराजमान होणार याबाबत सर्व हिवरखेड वासियांना उत्सुकता लागली असून. कोणत्याही गटा-तटाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने  मिळून-मिसळून खिचडी सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
सरपंच पदी कोणीही विराजमान झाले तरी हिवरखेड नगरपंचायत शासन दरबारी प्रस्तावित असल्याने नवीन सरपंचाचे पद औटघटकेचे राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 नगरपंचायत च्या मुद्द्यावर 40,000 हिवरखेड वासी भावनात्मक रित्या जोडल्या गेले असून कोणी चुकूनही नगरपंचायत थांबविण्याचा छुपा प्रयत्न केल्यास त्यांना हिवरखेड वासियांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यांची प्रतिमा हिरो ते झिरो होण्यास वेळ लागणार नाही. सामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्याचा काय परिणाम होतो ह्याची प्रचिती जनतेने नुकतीच मतदानातून दाखवून दिली आहे.


मागील एकवीस वर्षात हिवरखेडला एकही पंचवार्षिक सरपंच  मिळाले नाही याला जनतेचे सुदैव म्हणावे की दुर्दैव हेच कळत नाही. मध्यंतरी शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा नियम  केला होता परंतु त्या काळात हिवरखेड ग्रामपंचायत निवडणूक न झाल्याने हिवरखेडच्या जनतेला थेट सरपंच निवडण्याचा मान मिळाला नाही. 

मागील 21 वर्षात सर्वच 13 सरपंच, प्रभारी सरपंच, प्रशासक यांनी "सबका साथ सबका विकास" ह्या तत्वावर भरपूर विकास केला. ग्रामपंचायतला विविध योजनांच्या माध्यमातून मोठा निधी मिळत असल्याने सरपंचांना "विकास" करण्यास भरपूर वाव असतो.

सरपंच पदाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने आणि शक्यतो कोणालाही एक हाती बहुमत मिळत नसल्याने अनेक जणांना विकास करण्याची संधी मिळावी ह्या उदात्त हेतूने सरपंच पद आळीपाळीने, सामंजस्याने वाटून घेण्यात येते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींचे ध्येय असलेले "सबका साथ सबका विकास" हे वाक्य खऱ्या अर्थाने हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये साकार होताना दिसत आहे. 
परंतु सदर विकास गावाचा होतो की स्वतःचा हे एक न उलगडणारे कोडे असून सुजाण नागरिक आप आपल्या परीने मूल्यांकन करून त्याचा अर्थ लावत असल्याचे दिसते. 

हेही वाचा - भीषण अपघात; कुत्र्याला वाचववताना कारचा झाला चुराडा

विकासाबाबत किर्तीमान होणार की नाही ह्याची कल्पना नाही पण कमी काळात सर्वाधिक सरपंच देण्याचा बहुमान हिवरखेड ला मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा हिवरखेड वासी गमतीने करीत आहेत. यासाठी लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे प्रस्ताव पाठवावा असा मजेशीर सल्ला सुद्धा खासगीत बोलताना जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com