पाच हजार द्या, मिळवा कोरोना पॉझिटीव्‍ह स्‍वॅब ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रूग्ण

पाच हजार द्या, मिळवा कोरोना पॉझिटीव्‍ह स्‍वॅब !

खामगाव (जि.बुलडाणा) : येथे उघडकीस आला प्रकार खामगाव - कोविड वार्डात उपचार घेत असलेल्‍या पॉझीटीव्‍ह रुग्‍णांचे परत स्‍वॅब घेवून बाहेर विक्री करण्यात येत असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार खामगाव उपजिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयातील कोविड सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. त्‍यामुळे, एकच खळबळ उडाली असून, विम्‍याच्‍या रकमेसाठी हा किळसणवाणा प्रकार होत असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. (Corruption at covid Center in Khamgaon for Corona Swab)

हेही वाचा: शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले

कोरोना महामारीच्‍या काळात देखील काही जण स्‍वस्‍तःचे उखळ पांढरे करण्याच्‍या संधी शोधत असून, आतापर्यंत रेमडीसीव्‍हीरचा काळा बाजार, खाजगी रुग्‍णालयांकडून होत असलेल्‍या कोविड प्रोटोकॉलचे उल्‍लंघन अशा प्रकारांवरुन हे समोर आले आहे. परंतु, आता खामगाव येथील उपजिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयातील कोविड सेंटरमध्ये चक्‍क पॉझिटीव्‍ह रुग्‍णांचे स्‍वॅब विक्री केल्‍या जात असल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द रुग्‍णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

मागील काही दिवसांपासून शहरातील एका खाजगी कंपनीमधील कर्मचारी जास्‍त संख्येने स्‍वॅब देण्यास येत असल्‍याची बाब निवासी वैद्यकीय अधिकारी निलेश टापरे यांच्‍या निदर्शनास आली. त्‍यावरुन त्‍यांनी खाजगी कंपनीतील स्‍वॅब देण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्‍या अाधार कार्डची तपासणी करण्याचे आदेश दिले. दरम्‍यान बुधवार (ता.३०) कोविड वार्डात उपचार घेत असलेल्‍या चार रुग्‍णांच्‍या नाकात दुखत असल्‍याची माहिती रुग्‍णालयातील कर्मचारी डॉ. प्राची निवळ यांंनी त्‍यांना दिली. त्‍यावरुन त्‍यांनी कोविड वार्डा जाऊन येथे कोणी बाहेरचा व्‍यक्‍ती आला का ? याबाबत सुरक्षा रक्षकास विचारणा केली.

हेही वाचा: दुहेरी हत्याकांड; शिक्षकाने केली युवकाचा खून, शिक्षकाचाही मृत्यू

त्‍यावर त्‍याने बाहेरील नाही पण, कंत्राटी कक्ष सेवक विजय राखाेंडे आल्‍याची माहिती दिली. यावेळी डॉ. टापरे यांनी राखोंडे यास उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णांसमोर आणले असता रुग्‍णांनी याने आमचे स्‍वॅब घेतल्‍याचे सांगितले. वास्‍तविक पाहता कक्ष सेवक राखाेंडे यास स्‍वॅब घेण्याचे कोणतेच अधिकार नाही. घडलेल्‍या प्रकारावरुन डॉ. टापरे यांना संशय आल्‍याने त्‍यांनी विजय खंडारे याची कसून चौकशी केली असता चंद्रकांत उमाप नामक व्‍यक्‍ती अापल्‍या जवळील हे स्‍वॅब पाच हजार रुपये प्रमाणे विकत घेत असल्‍याची कबुली दिली.

हेही वाचा: भाजपकडून १४ जागांसाठी ८० इच्छुकांच्या मुलाखती

कोरोना पॉझिटीव्‍ह व्‍यक्‍तींचे स्‍वॅब स्‍वतः जवळ बाळगून शासनाच्‍या कोविड नियमांचे उल्‍लंघन केल्‍या प्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकारी टापरे यांनी पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या तक्रारीवरुन गुन्‍हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची चांदी, दोन्हीकडून काढले बिलं

विम्‍याच्‍या रकमेसाठी खटाटोप

कोरोना काळात अनेक खाजगी कंपनींकडून विम्‍याचे संरक्षण देण्यात आले. परंतु, विम्‍याची रक्‍कम मिळण्यासाठी पॉझीटीव्‍ह नसताना सुध्दा पॉझिटीव्‍ह अहवाल मिळावा यासाठी काहींकडून ही शक्‍कल लढवल्‍या गेल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.

अनेक प्रकरणांचा होत आहे उलगडा

कोरोना महामारीच्‍या काळात अनेकांचा जगण्याशी संघर्ष सुरु असतांना काहींनी मात्र याला संधीत रुपांतरीत केले असल्‍याचे दिसून येते. शहरात रेमडिसिव्‍हीरचा काळा बाजार, अवैध कोविड सेंटरच्‍या माध्यमातून रुग्‍णांवर केले गेलेले उपचार, रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांच्‍या नावे नोंद करुन धनाड्यांनी घेतलेली लस, तर आता समोर आलेल्‍या स्‍वॅब विक्रीच्‍या प्रकरणांवरुन येत्‍या काळात आणखी किती बाबींचा उलगडा होणार अशी चर्चा शहरात रंगत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Corruption at covid Center in Khamgaon for Corona Swab

टॅग्स :BuldhanaKhamgaon