esakal | दुकानदारांची पालिका कर्मचाऱ्यांसोबत फिक्सिंग

बोलून बातमी शोधा

 दुकानदारांची पालिका कर्मचाऱ्यांसोबत फिक्सिंग
दुकानदारांची पालिका कर्मचाऱ्यांसोबत फिक्सिंग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि.वाशीम) : ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, शहरातील अनेक व्यावसायिकांनी ‘दुकान सुरूच आहे...तुम्ही फक्त शटर वाजवा; आम्ही आतच आहोत’चा पवित्रा घेतल्याने शहरात लॉकडाउनचा पुरता फज्जा उडत आहे. काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता लॉकडाउनचा मंगरुळपीर शहरात फज्जा उडत आहे. या सर्व बाबींसाठी पालिका कर्मचाऱ्यांचा अशा व्यावसायिकांवर वरद हस्त असल्याचे बोलले जाते.

मंगरुळपीर शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. सर्वच दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेले असून, अनेक रुग्णांना वाशीम-अकोला येथे हलविण्यात आल्यावर ऐनवेळी त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. एकूण अशी बिकट अवस्था असताना वाशीम जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या निर्बंधांना मंगरुळपीरात पावलोपावली बगल दिली जात आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी चार रेल्वेगाड्या रद्द

काही व्यावसायीक नियमांचे पालन करीत निर्बंध लागू झाल्यापासून त्यांचे पालन करीत आहेत; मात्र, ‘बंदीत चांदी’ करून घेण्याच्या हव्यासाने अनेक व्यावसायिकांनी आदेश झुगारून त्यांची दुकाने आतून चालूच ठेवली आहेत. परिणामी शहरात सर्वत्र दुकाने बंद दिसत असली तरी, प्रत्यक्षात ती छुप्या पद्धतीने सुरूच असतात. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा: कापूस पिकासाठी जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

छोट्या लघु व्यावसायिकावर स्वतःचा जोर अजमावून त्यांचेवर दंडात्मक कारवाई केल्याचा बोभाटा करून शाबासकी मिळविणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना अनेक नागरिकांनी तोंडी सांगूनही सदर व्यवसायिकांवर ते कारवाई का करत नाहीत? सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना लॉकडाउनमध्ये शिथिलता शासनाने दिली मात्र, याच वेळेचा इतर मोठे व्यावसायिक फायदा घेत ७ ते ११ या वेळेत शेकडो ग्राहकांना दुकानात घेऊन माल विक्री करत आहेत. ही माहिती पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी दिल्यावरही पालिका कर्मचारी त्यांच्या तोंडी तक्रारीला कानाडोळा करून फक्त गाडीवर भोंगा लावून फिरत आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत, अशी फसवीगिरी शासनासोबत करीत असल्याचे चित्र सध्या मंगरुळपीर शहरात पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा: विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त

पालिका कर्मचाऱ्यांची अशा व्यावसायिकांसोबत ‘फिक्सिंग’ तर नाही ना, असा प्रश्नही शहरातील काही जागरूक नागरिक करीत आहेत. याशिवाय याखेरीज जीवनावश्यक सेवेतील दुकानांमध्ये कुठेही सोशल डिस्टंन्सिंग व इतर नियम पाळले जात नाहीत. प्रत्येक दुकानात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. गत दिवसांत शहरातील हे चित्र पाहता शासनाने लॉकडाउन कोणासाठी लावला हा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, लॉकडाउनला नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने प्रतिसाद दिला असून, काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता इतर सर्वच दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. रस्त्यावर तुरळक प्रमाणात नागरिक दिसतात. अशी स्थिती मंगरुळपीर शहरातील लॉकडाउनची असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सकाळच्या शिथिल वेळेत अचानक शहरातील फेरफटका मारला असता त्यांना हे विदारक वास्तव दिसेल असेही मत शहरातील काही सामाजिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या नागरिकांचे आहे.

मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी

जिल्हाधिकारी षण्मुखरांजन यांनी कोरोना संकटात तत्काळ मंगरुळपीर येथील नगर परिषदेला स्थायी नसेल परंतु अस्थायी स्वरूपात मुख्याधिकारी यांची नियुक्ती करावी अशीही मागणी होत आहे. जो पर्यंत येथील नगर परिषदेला मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत भोंगळ कारभार चालणार असल्याचे चित्र येथील नगर परिषदेमध्ये आहे.

संपादन - विवेक मेतकर