
वडीलांचे हार्टअटॅकने तर सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू
चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी पूर्व तयारी करण्यात येत आहे. ही तयारी अद्याप सुरू असतानाच गुरुवारी (ता. २७) उशीरा रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात एका सहा महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे जीव गेला. (Six-month-old-girl-dies-of-corona-in-Akola)
अकोला ः कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त सहा महिन्यांच्या चिमुकलीचा गुरुवारी (ता. २७) उशीरा रात्री बळी गेला. सहा महिन्यांपूर्वीच तिचा पित्यांचे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. एकाच कुटुंबात काही महिन्यांच्या फरकाने दोन मृत्यू झाल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील खान कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळला आहे. (Six month old girl dies of corona in Akola)
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या उपचारासाठी वैद्यकीय साहित्याची जुळवाजुळव शासकीय यंत्रणा करत असून चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी पूर्व तयारी करण्यात येत आहे. ही तयारी अद्याप सुरू असतानाच गुरुवारी (ता. २७) उशीरा रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात एका सहा महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे जीव गेला.
या चिमुकलीला गुरुवारी (ता. २७) रात्री ९.४० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयातील वार्ड क्रमांक २९ मध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच उशीरा रात्री १ वाजतानंतर तिची प्राणज्योत मावळली.
चिमुकलीला अचानक मृत्यूने कवटाळल्यामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील रहिवाशी खान कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकलीच्या मृत्यूनंतर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात व्यक्त करण्यात आलेली शक्यता अधिक गडद झाल्याने आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
चिमुकली पोटात असतानाच वडिलांचा मृत्यू
बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील खान कुटुंबात जन्मलेली चिमुकली पोटात असतानाच तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे चिमुकलीची आई पतीच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची निशाणी घेवून जगत होती. पण नियतीनेही तिही हिरावून घेतली. या चिमुकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहा वर्षांनंतर हलला होता पाळणा
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीच्या आई-वडिलांना लग्नाच्या दहा वर्षांतर मुलगी झाली होती. त्यामुळे चिमुकली पोटात असतानाच तिच्या घरी अत्यानंद झाला होता. परंतु तिच्या जन्मापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्याने तिच्या आईवर दुःखांचा डोंगर कोसळा होता. काही महिन्यात कोरोनाने या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सहा महिन्याच्या चिमुकलीला सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी (ता. २७) रात्री भरती करण्यात आले होते. तिच्या हृदयामध्ये छिद्र होते व ती अत्यवस्थ होती. तिची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
- डॉ. विनीत वरठे
बाल रोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला
संपादन - विवेक मेतकर
Six-month-old-girl-dies-of-corona-in-Akola